सहा जखमी.तीन अत्यवस्थ.
एरंडोल प्रतिनिधि :-एरंडोल भरधाव वेगाने जाणा-या आयशर ट्रक व मारुती इकोची समोरासमोर धडक झाल्यामुळे झालेल्या अपघातात इको वाहनाच्या चालकासह अन्य एक जण जागीच ठार झाला तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले.जखमींमध्ये तीन जण अत्यवस्थ असून त्यांचेवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जळगाव येथे रवाना करण्यात आले.हा अपघात आज रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास राष्ट्रीय महामार क्रमांक सहावर पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रा जवळ झाला.अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
याबाबत माहिती अशी,की आज रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास जळगाव कडून धुळ्याकडे जिल्हा दुध संघाचे दुध घेवून जाणारी आयशर ट्रक क्रमांक एम.एच.४३ वाय.०२३८ आणि धुळ्याकडून जळगाव कडे जाणारी मारुती इको क्रमांक एम.एच.१९ व्ही.९२५७ ची राष्ट्रीय माहामार्ग क्रमांक सहा जवळील पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राजवळ समोरासमोर धडक झाली.अपघातस्थळी वळण असल्यामुळे आणि सर्वत्र अंधार असल्यामुळे चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे दोन्ही वाहने एकमेकांवर धडकल्याचा प्राथमिक अंदाज आहे.अपघातात इको चालकासह अन्य एक जण जागीच ठार झाला.अपघातात इको चालक बाळा (रा.बिलवाडी),व धनराज बाविस्कर रा.रामेश्वर कॉलनी जळगाव हे जागीच ठार झाले.तर ज्योती रवींद्र शिंदे वय ३७,ललित रवींद्र शिंदे वय २९ दोन्ही रा.एरंडोल,जयश्री धनराज बाविस्कर,भारती किरण जाधव,आशुतोष बाविसकर,सुमनबाई मोतीलाल शिंदे हे गंभीर जखमी झाले.
जखमींवर ग्रामीण रुग्नालायात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे.अपघातग्रस्त इको मधील प्रवासी कौटुंबिक कामासाठी साक्री येथे गेले होते तर आयशर ट्रक जळगाव येथून दुध घेवून धुळ्याकडे जात होती.अपघातानंतर इको चालकास दरवाजा तोडून बाहेर काढण्यात आले.अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती.पोलीस कर्मचारी आणि युवकांनी जखमीना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली.