वेस्ट इंडिजचा भारतावर ५ गडी राखून विजय मालिकेत १-१ बरोबरी

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध टी-२० मालिकेत १-० अशी विजयी घौडदौड सुरू केली असतानाच आज दुसरा सामना वेस्ट इंडिजच्या गलथान कारभारामुळे तब्बल ३ तास उशिराने सुरू झाला. साधारण इतक्या वेळात सामन्याच्या निकालापर्यंत प्रेक्षकवर्ग पोहचला असता. वेस्ट इंडिजने पुन्हा नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली.
कर्णधार रोहित शर्मा आणि सुर्यकुमार यादव यांनी डावाची सुरूवात केली. पण ओबेद मॅकोयने रोहितला पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद करत निर्धाव षटक नोंदवले.

पुढच्या षटकात सुर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरने मिळून १७ धावा काढल्या. स्वतःच्या दुसर्‍या आणि डावाच्या तिसर्‍या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर ओबेद मॅकोयने सुर्यकुमार यादवला ११ धावांवर बाद केले. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत डाव सावरतील असं वाटत असतानाच अल्झारी जोसेफने अय्यरला १० धावांवर बाद केले. ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या हळूहळू डावाला आकार देऊ लागले. ६व्या षटकात भारताच्या ५६/३ धावा झळकल्या. अकील हुसेनने ऋषभ पंतला २४ धावांवर बाद केले. रवींद्र जडेजा खेळपट्टीवर उतरला. १०व्या षटकाच्या अखेरीस भारत ७५/४ अशा अवस्थेत होता. अखेरीस १३व्या षटकात १०० धावा धावफलकावर झळकल्या. ४३ धावांची ही भागीदारी जेसन होल्डरने हार्दिक पांड्याला ३१ धावांवर बाद करत भेदली. भारतीय संघ १०४/५ असा कोलमडला होता आणि मागच्या सामन्याचा सामनावीर दिनेश कार्तिक खेळपट्टीवर उतरला.

आजही त्याच्याकडून संघाच्या भरपूर अपेक्षा आहेत, बघू या तो पूर्ण करू शकतो का? रवींद्र जडेजाला ओबेद मॅकोयने २७ धावांवर बाद केले. रविचंद्रन आश्विन खेळपट्टीवर उतरला. त्याने १२व्या षटकानंतर पहिला चौकार १८व्या षटकात मारला. १९व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दिनेश कार्तिकला ओबेद मॅकोयने ७ धावांवर बाद केले आणि भारतीय संघाला १५० धावाही करणं जवळपास अशक्य दिसू लागलं. त्याच षटकात आश्विनला १० धावांवर आणि भुवनेश्वर कुमारला केवळ एक धावसंख्येवर ओबेद मॅकोयने बाद केले. ओबेद मॅकोयचं गोलंदाजी पृथक्करण ४-१-१७-६ असं होतं. जेसन होल्डरने १९.४ षटकात आवेश खानचा ८ धावांवर त्रिफाळा उध्वस्त करत भारतीय संघाला १३८ धावांवर रोखलं. वेस्ट इंडिज गोलंदाजांनी आज कमालीची गोलंदाजी करत भारतीय संघाला गुंडाळलं. प्रत्युत्तरादाखल भारतीय गोलंदाज काय कामगिरी करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.

वेस्ट इंडिजकडून डावाची सुरूवात करण्यासाठी ब्रँडन किंग आणि काईल मेयर्स यांनी केली. भुवनेश्वर कुमारचा पहिलाच चेंडू सीमापार पाठवत किंगने आपले मनसुबे उघड केले. ७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्याने काईल मेयर्सला ८ धावांवर बाद केले. निकोलस पुरन झटपट धावा जोडण्याच्या नादात १४ धावांवर आश्विनच्या गोलंदाजीवर बाद झाला. १०व्या षटकाच्या अखेरीस वेस्ट इंडिज ७३/२ अशा भक्कम अवस्थेत होता. ब्रँडन किंगने १२व्या षटकात वैयक्तिक अर्धशतक झळकावलं. पुढच्याच षटकात रवींद्र जडेजाने शॅमरॉन हेटमायरला ६ धावांवर बाद केले. १५व्या षटकाच्या अखेरीस वेस्ट इंडिज १०१/३ अशा भक्कम अवस्थेत होता. ३० चेंडूंमध्ये ३८ धावांची गरज होती. आवेश खान पुन्हा गोलंदाजीसाठी आला आणि त्याने ब्रँडन किंगचा त्रिफाळा ६८ धावांवर उध्वस्त केला.

रावमन पॉवेल खेळपट्टीवर उतरला. भारतीय गोलंदाजांनी धावांवर अंकुश लावला. १२ चेंडूंमध्ये १६ धावा असं समीकरण झालं. १९व्या अर्शदीप सिंगने रावमन पॉवेलचा ५ धावांवर त्रिफाळा उध्वस्त केला. ६ चेंडूंमध्ये १० धावा असं समीकरण झालं. शेवटचं षटक टाकण्यासाठी आवेश खान सज्ज झाला. पण पंचांनी पहिलाच चेंडू नो बॉल घोषित केला त्यावर फलंदाजांनी एक धाव काढली आणि डेवन थॉमस फलंदाजीसाठी सामोरा आला. त्याने पहिलाच चेंडू दर्शकदीर्घेत पाठवला आणि दुसर्‍या चेंडूवर विजयी चौकार मारत वेस्ट इंडिजच्या नावावर विजय कोरला. त्याने नाबाद ३१ धावा काढल्या. वेस्ट इंडिजने १४१/५ अशी विजयी धावसंख्या नोंदवत मालिकेत १-१ बरोबरी साधली.

रोहित शर्माने अनुभवी भुवनेश्वर कुमार ऐवजी नवोदित आवेश खानला शेवटचं षटक टाकण्यासाठी का निवडले हा चर्चेचा विषय ठरेल. विराट कोहली आणि सुर्यकुमार यादवची तो करत असलेली पाठराखण भारतीय संघाला मारक ठरत असताना हा गोलंदाजीचा निर्णयही त्याच्या अंगाशी आला आहे.
ओबेद मॅकोयला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचं गोलंदाजी पृथक्करण ४-१-१७-६. पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतला तिसरा सामना २ ऑगस्ट रोजी (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) रात्री ८ वाजता सुरू होणार आहे.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार