दुर्दैवी : आजोबांनी दिलेलं बिस्किट खाऊन झोपी गेला, रात्री अचानक किंचाळून उठला, चिमुकल्याचा बापाच्या कडेवरच मृत्यू

Spread the love

औरंगाबाद :- सध्या महाराष्ट्रात सर्प दंश झालेल्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच घरात झोपलेल्या चार वर्षीय चिमुकल्याला साप चावल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. मुलाला साप चावल्याने तो जोरात किंचाळला, त्याचा आवाज ऐकून वडिलांनी क्षणाचाही विलंब न करता मुलाला कडेवर घेत रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, नियतीला काही औरच मंजूर होते. त्या चिमुकल्याने रस्त्यातच वडिलांच्या कडेवर जीव सोडला. ही मन हेलावून टाकणारी घटना गंगापूर तालुक्यातील शहापूर घोडेगाव येथे घडली. कृष्णा साईनाथ राजदिवे असे या चिमुकल्याचे नाव आहे.

साईनाथ राजदिवे यांना दोन मुलं आहेत. त्यातील कृष्णा हा लहान होता. त्याने जेमतेम गावातील अंगणवाडीत जाण्यास सुरुवात केली होती. लहान असल्याने घरातील सर्वांचा लाडका होता. शिवाय, बोलका असल्याने गावकऱ्यांचा देखील लाडका झाला होता. नित्याप्रमाणे सोमवारी रात्री सर्वांनी सोबत जेवण केले.

आजोबाने आणलेली बिस्किटं आवडीने खाल्ली आणि रात्री ११ वाजेच्या दरम्यान तो झोपी गेला. आई – वडीलही झोपी गेले. मात्र तासाभरानंतर १२ च्या सुमारास कृष्णाची किंकाळी ऐकू आल्याने आई – वडील घाबरून झोपेतून जागे झाले. त्यांनी कृष्णाला पाहिले असता त्याच्या पायाला सार्प दंश झाल्याचे समजले.

त्याच परिस्थितीत वडिलांनी त्याला कडेवर घेतलं आणि रुग्णालयाकडे निघाले. मात्र, त्या बापाचे सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले. रुग्णालय पोहोचण्याआधीच चिमुकल्या कृष्णाने वडिलांच्या कडेवर जीव सोडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ऐन नागपंचमीच्या दिवशी गावात एकच शोककळा पसरली होती.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार