भारताचा झिम्बांब्वेवर १० गडी राखून विजय

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वेस्ट इंडीजला नामोहरम करून झिम्बांब्वेला पोहचलेल्या भारतीय संघाच्या नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत आयत्यावेळी संघात दाखल झालेल्या के. एल. राहुलला संघाची धुरा सोपवण्यात आली. त्याने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दीपक चहरने सलामी फलंदाजांना स्थिरावू न दिल्यामुळे झिम्बांब्वे संघाला धावफलक हलता ठेवता आला नाही.

सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार रिगीस चकब्वाने सर्वाधिक धावा काढल्या. त्याने चार चौकारांच्या सहाय्याने ३५ धावा काढल्या. त्याचा त्रिफाळा अक्षर पटेलने उध्वस्त केला. ११०/८ अशा अवस्थेत असलेल्या झिम्बांब्वे संघाला झटपट गुंडाळण्यात बेसावध भारतीय गोलंदाजांना अपयश आलं. त्याचाच परीणाम म्हणून ९व्या क्रमांकासाठी ७० धावांची भागीदारी ब्रॅड इव्हान्स आणि रिचर्ड नागरावा यांनी केली. झिम्बांब्वे संघ ४९.३ षटकांत १८९ ला सर्वबाद होऊन परतला.

दीपक चहर, अक्षर पटेल आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी ३ गडी तर महंमद सिराजने एक गडी बाद केले.
एकतर्फी झालेल्या ह्या सामन्यात भारतीय सलामीवीरांनी १९२ धावा काढत. सामना भारतीय संघाच्या खिशात १० गडी राखून घातला. भारताने विजयी लक्ष्य केवळ ३०.५ षटकांत गाठले. शिखर धवनने ९ चौकारांसह नाबाद ८१ तर शुभमन गीलने १० चौकार आणि एका षटकारासह नाबाद ८२ धावा काढल्या.

दीपक चहरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने ७ षटकांमध्ये २७ धावा देत ३ गडी बाद केले. झिम्बांब्वे विरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना २० ऑगस्ट रोजी (भारतीय प्रमाण वेळेप्रमाणे) दुपारी १२:४५ वाजता सुरू होणार आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार