एरंडोल विधानसभा मतदार संघातील विकासकामांसाठी ५९ कोटी रुपये मंजूर.-आमदार चिमणराव पाटील.

Spread the love

एरंडोल तालुक्यासाठी ३५ कोटी तर पारोळा तालुक्यासाठी अठरा कोटींचा समावेश.

झुंजार । प्रतिनिधी

एरंडोल-एरंडोल विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी सुमारे ५९ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.यामध्ये एरंडोल तालुक्यासाठी सुमारे ३५ कोटी तर पारोळा तालुक्यासाठी अठरा कोटी ८० लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.तसेच शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत एरंडोल येथील नगर पालिकेच्या नवीन इमारत बांधकामासाठी तीन कोटी रुपये तर पारोळा पालिका हद्दीतील नवीन वसाहतींमधील खुल्या भूखंडावर विविध ठिकाणी सार्वजनिक उद्यानांचे सुशोभीकरणासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी आगामी काळात मतदार संघातील विकास कामांसाठी यापेक्षा जास्त निधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.

एरंडोल तालुक्यासाठी ३५ कोटी तर पालिकेच्या नवीन इमारात बांधकामासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे सांगितले.यामध्ये सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून कासोदा गावातील भडगाव रस्त्यापासून उर्दू शाळा व मंदिरापर्यंत रस्त्याचे कॉंक्रीटीकरण व तळई ते उत्राण रस्त्यावर राहिलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे.सावदा गावातील एक किलोमीटर रस्त्याचे कॉंक्रीटीकरण व डांबरीकरण,खर्ची गावातील एक किलोमीटर रस्त्याचे कॉक्रीटीकरण आणि डांबरीकरण,खर्ची गावापुढील म्हसावद रस्त्याला लागून एक किलोमीटर रस्त्याचे कॉक्रीटीकरण आणि डांबरीकरण या कामांसाठी तीन कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

हनमंतखेडे ते उत्राण या रस्त्याचे रुंदीकरणासह डांबरीकरण या कामासाठी चार कोटी रुपये मंजूर झाले आहेत.ताडे गावापासून पुढे रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणासाठी दीड कोटी रुपये,खर्ची गावाजवळ असलेल्या अपघाती पुलाचे नवीन बांधकाम करण्यासाठी दोन कोटी रुपये,नांदखुर्द ते फरकांडे गावापर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणासाठी चार कोटी रुपये,प्रमुख जिल्हा मार्ग असलेल्या गालापूर फाटा ते खडके आणि खडके ते वनकोठे या नवीन रस्त्यांच्या कामांसाठी ८ कोटी १० लाख रुपये,निपाणे ते जवखेडे या दोन किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरण यासाठी तीन कोटी रुपये,नांदखुर्द गावाजवळ असलेल्या अंजनी नदीवर मोठा पूल बांधण्यासाठी सहा कोटी रुपये,धरणगाव चौफुली ते टोळी गावापर्यंत विविध माहिती फलक बसविणे,माईल स्टोन बसविणे आणि रोड मार्किंग पेंट करणे या कामांसाठी चाळीस लाख रुपये मंजूर झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

तीन महिन्यांपूर्वी कासोदा रस्त्यावरील एकचक्रनगरी सार्वजनिक उद्यानाच्या लोकार्पणप्रसंगी आमदार चिमणराव पाटील यांनी पालिकेच्या नवीन इमारत बांधकामासाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले होते.नवीन इमारतीच्या बांधकामासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी मिळाल्यामुळे पालिका कर्मचारी आणि नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.यापूर्वी देखील आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून शहरासाठी सुमारे पंचवीस ते तीस कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून विविध कामे सुरु आहेत.रांगार खिडकी ते गांधीपुरा या भागाला जोडणा-या व सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून अंजनी नदीवर पुलाचे बांधकाम वेगाने सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील,जळूचे माजी सरपंच रवींद्र जाधव,माजी नगरसेवक चिंतामण पाटील,संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य आनंदा चौधरी (भगत),बबलू पाटील,गोरख चौधरी,कृशा ओतारी यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी तुषार शिंपी यांची शिंपी समाज युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आमदार चिमणराव पाटील यांचेहस्ते सत्कार करण्यात आला.

टीम झुंजार