पत्रकार संघाच्या वतीने विधवा महिलांना साडी-चोळी भेट अनोखा उपक्रम संपन्न
बीड प्रतिनिधी :– बाई देखील हाडामासाची माणूस आहे हे समाजाने आता तरी समजून घेणे गरजेचे आहे. केवळ समर्पण इतकेच भाग्य महिलांच्या पदरी नसावे. महिलांनी त्यांच्यातील कार्यक्षमता कायम टिकवणे गरजेचे असल्याचे मत माजी आमदार उषाताई दराडे यांनी व्यक्त केले.
तर त्या काळात फुले दांपत्यांनी व्यवस्थेला सुरुंग लावण्याचे खरे काम केले विधवा होणे हा महिलांचा दोष नसल्याचे स्पष्ट मत प्रा. सुशीलाताई मोराळे यांनी व्यक्त केले. बीड येथील स.मा.गर्गे भवन येथे मकर संक्रांतीनिमित्त शनिवार दिनांक 15 जानेवारी 2022 रोजी दुपारी 1 वाजता एक संक्रांत कुंकवा पलीकडची हा अनोखा उपक्रम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, बीड जिल्हा शाखेच्या वतीने संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार उषाताई दराडे यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख वक्ते म्हणून डाव्या विचाराच्या नेत्या प्रा. सुशीलाताई मोराळे यांची उपस्थिती होती. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संघाचे मार्गदर्शक संतोष मानूरकर, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर, ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे, पत्रकार संघाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, सौ अनिताताई गंगाधर काळकुटे,तुलसी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या उमाताई जगतकर,ज्येष्ठ संपादिका सौ सुमनताई पिंगळे, श्रीमती सुलभाताई विठ्ठल जाधव, श्रीमती मनिषा पवार, श्रीमती ललिता तांबारे, श्रीमती सुलोचना वारे, श्रीमती मंगल जगताप, सौ वर्षा स्वामी, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ जाधव, कार्यक्रमाच्या आयोजिका श्रीमती प्रतिभा गणोरकर, शेख आयेशा शेख रफीक आदींची प्रमुख उपस्थिती लाभली.
पुढे बोलताना उषाताई दराडे म्हणाल्या, पत्रकार संघाने विधवा महिलांचा मान सन्मान करून खऱ्या अर्थाने एक आदर्श पाऊल समाजापुढे उभे केले आहे. दुःख सहन करण्याची ताकद महिलांमध्ये जन्मतः मिळालेली असते. महिलांनी मात्र आपल्या आयुष्यात रडत बसण्यापेक्षा नेहमी खेळाडू वृत्तीने जगले पाहिजे. आपल्याला जे काही मिळवायचे ते मिळवण्यासाठी आपल्यातली कार्यक्षमता वाढवणे आणि ती टिकवणे देखील गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.याप्रसंगी सुशीलाताई मोराळे पुढे बोलताना म्हणाल्या, पत्रकार संघाने राबविलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. यातून हा संदेश जगासमोर येईल, महिलांनी स्वतःला बदलावे तरच जग बदलणार आहे.
महिलांना अपमानीत करणाऱ्या परंपरा आता बदलणे गरजेचे आहे. राशीतील मंगळ, विधवेचे जगणे यावर प्रहार करण्यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यावा. त्या काळात ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या दाम्पत्यांनी विधवा महिलांचे बाळंतपण स्वतःच्या घरी करून व्यवस्थेला सुरुंग लावण्याचे खरे काम केले. तो आदर्श पुढे कायम आपण कृतीतून जागृत ठेवला पाहिजे.उषाताई यांनी त्यांचे लग्न अमावस्येला केले. माझे लग्न मंगलाष्टकाने नव्हे तर प्रतिज्ञा घेऊन झाले, असे बदल घडणे गरजेचे आहे असे परखड मत व्यक्त केले.याप्रसंगी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या कुटुंबातील विधवा महिलांना व इतर समाजसेवेत कार्य करणाऱ्या एकल विधवा महिलांचा देखील साडी चोळी सन्मानपत्र भेट देऊन गौरव करण्यात आला.
एकल विधवा महिलांना साड्या भेट देण्यासाठी दैनिक सूर्योदयचे संपादक गंगाधर काळकुटे यांनी आयोजकतत्त्व स्वीकारून पुढाकार घेतल्याबद्दल पत्रकार संघाच्या वतीने काळकुटे दाम्पत्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.यावेळी आदर्श ज्येष्ठ संपादिका सुमनताई पिंगळे, प्राचार्य उमाताई जगतकर, ज्येष्ठ पत्रकार जगदीश पिंगळे, समाज सेवक डॉक्टर गणेश ढवळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाच्या आयोजक प्रतिभाताई गणोरकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी यांनी तर आभार पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष शेख आयेशा शेख रफिक यांनी मानले.
या कार्यक्रमाला पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियातील महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. या अनोख्या आणि मीडिया क्षेत्रात राज्यामध्ये पहिल्यांदा राबवण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ज्येष्ठ पत्रकार पिंगळे दाम्पत्य खरे आदर्श जोडपेआपल्या घरात मोठ्या बंधूचे निधन झाल्यानंतर विधवा झालेल्या वहिनी सोबत जगदीश पिंगळे या पत्रकाराने समाजव्यवस्थेला झुगारुन तिला सौभाग्यवतीचे जीवन जगण्यासाठी तिच्या समवेत लग्न करून खऱ्या अर्थाने आदर्श उभा केला.त्यामुळे उपस्थित माजी आमदार उषाताई दराडे प्रा. सुशीलाताई मोराळे यासह व्यासपीठावरील मान्यवरांच्या शुभहस्ते या दाम्पत्यांचा साडी चोळी, सन्मानपत्र भेट देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.