एरंडोलला श्रीगणेशाची उत्साहात स्थापना. सार्वजनिक गणेश मंडळाच्या भव्य मुर्त्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी

एरंडोल-शहरासह ग्रामीण भागात श्रीगणेशाची उत्साहात आणि शांततेत स्थापना करण्यात आली.शहरातील अठरा प्रमुख सार्वजनिक गणेश मंडळासह अन्य सुमारे शंभर लहान गणेश मंडळांनी तसेच नवीन वसाहतीमधील सर्व कॉलन्यांमध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली.यावर्षी सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी पंधरा ते वीस फुट उंच मूर्तींची स्थापना केली असून भव्य व आकर्षक मुर्त्या हे या वर्षाचे गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

सुमारे दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत होता.मागील वर्षी पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनास सर्व गणेश मंडळाच्या पदाधिका-यांनी प्रतिसाद देऊन शहरात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला होता.यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

शहरात आज सकाळपासूनच श्रीगणेशाच्या स्तापाना मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला होता.भगव्या चौकापासून स्थापना मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.शहरातील अठरा सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्य मिरवणूक काढून गणेशाची स्थापना केली.याशिवाय सुमारे शंभर लहान मंडळांनी देखील गणेशाची स्थापना केली आहे.शहराबाहेर असलेल्या सर्व नवीन वसाहतींमध्ये गणेशाची स्थापना करण्यात आली असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यावर्षी सर्व सार्वजनिक मंडळांनी सुमारे पंधरा ते वीस फुट उंचीच्या आकर्षक गणेश मूर्तींची स्थापना केली असून यावर्षी उंच व भव्य मुर्त्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.स्थापना मिरवणुकीत मंडळाचे कार्यकर्ते शिस्तबद्ध पद्धतीने लेझीम खेळत होते.आज सकाळपासूनच बाजारात पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविकांनी बाजारपेठेत गर्दी केली होती.गणेशाच्या रस्त्यावर ठिकठीकाणी लहान गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.

सामाजिक संस्थांनी केलेल्या पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनास भाविकांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल यांचेसह पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांचा ठिकठीकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

गणेशोत्सवाच्या दहा दिवसात सार्वजनिक गणेश मंडळांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून आकर्षक देखावे सादर केले जाणार आहेत.स्थापना मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार