शिरसगाव प्रतिनिधी
शिरसगाव :- श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगांव येथील माऊली वृद्धाश्रमात वृद्धांना सन्मान आणि माणुसकीचा आधार मिळतो, समाजातील ज्येष्ठांना अशी वागणूक मिळाली पाहिजे, त्यांच्यातील उणिवा नव्हे तर गुणवत्तेच्या जाणिवा शोधण्यातच माणुसकी होय असे मत अॅड.रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानचे चेअरमन व ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा सदस्य माजी प्राचार्य टी. ई. शेळके यांनी व्यक्त केले.
येथील गुरुमाऊली सेवाभावी संस्था संचलित माऊली वृद्धाश्रमात देणगी प्रदान आणि बांधकाम नियोजन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य शेळके बोलत होते.अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रा.शिवाजीराव बारगळ होते.डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी कार्यक्रम भूमिका सांगून प्रथम रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन आणि पुरोगामी विचारांचे आदर्श व्यक्तिमत्व प्रा.डॉ. एन.डी.पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्राचार्य शेळके, डॉ. उपाध्ये, प्रा. बारगळ यांनी डॉ.एन.डी.पाटील यांच्या समर्पित कार्याची माहिती दिली.प्राचार्य शेळके यांनी वृद्धाश्रमासाठी देणगी चेक माऊली वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाषराव वाघुंडे आणि सौ.कल्पनाताई वाघुंडे यांना प्रदान केला.यावेळी सर्व ज्येष्ठ स्त्री – पुरुष उपस्थित होते.
सुभाषराव वाघुंडे यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. प्राचार्य टी.ई.शेळके आपल्या मनोगतात म्हणाले की,माऊली वृद्धाश्रमात कौटुंबिक प्रेम मिळते.अशा ठिकाणी ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेल्या माणसांना मुक्त वातावरण आहे.त्यांच्याबद्दल सकारात्मक विचार केला पाहिजे, श्री व सौ.वाघुंडे यांनी आपली परिस्थिती नसताना हा वृद्धाश्रम सुरु करून गेल्या चार वर्षांपासून योग्यरीतीने प्रामाणिकपणे सांभाळत आहेत, त्यांना देतो तो देव या जाणिवेतून सहकार्य व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा.शिवाजीराव बारगळ यांनी अध्यक्षीय भाषणातून वाघुंडे परिवाराची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती आणि वाढती महागाई, बिघडते वातावरण आहे तरीही सेवाभावाने हे कार्य सुरु आहे, खोल्यांचे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर बांधकाम हाती घेतले आहे, त्यांना मदत मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले,यावेळी सौ. कल्पनाताई वाघुंडे म्हणाल्या की, सर्वांनी असेच योगदान दिले आणि दररोज वर्षाच्या ३६५ दिवसाचे वाढदिवस येथे साजरे झाले तर निदान वृद्धाश्रमातील वृद्धांचा जेवणाचा प्रश्न सुटेल असे सांगून आभार मानले.