श्रीरामपूर प्रतिनिधी
श्रीरामपूर :- तालुक्यातील उंबरगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचा समारोप विद्यार्थीनिनी साकारलेल्या सावित्री व जिजाऊ यांच्या भाषणाने झाला.
प्रत्येक वर्षी ३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस म्हणून सर्वदूर साजरा केला जातो.तर १२ जानेवारी या दिवशी जिजाऊ यांची जयंती साजरी केली जाते. यानिमित्ताने यावर्षी महाराष्ट्र शासनाने सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार प्रत्येक शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, जिल्हा परिषद उंबरगाव शाळेत देखील वैविध्यपूर्ण अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात प्रमुख आकर्षण होत्या सावित्री व जिजाऊ यांच्या वेषातील शाळेतील विद्यार्थिनी भक्ती बोल्हे व अक्षदा मुसमाडे.
संपूर्ण विद्यार्थ्यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम विशेष उल्लेखनीय ठरला.या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरसाळी येथील विद्यार्थिनी भक्ती बोल्हे तसेच बेलापूर येथील केशव गोविंद विद्यालयाची विद्यार्थिनी अक्षदा मुसमाडे यांनी अनुक्रमे साकारलेली सावित्री व जिजाऊ यांची भूमिका आणि त्यांच्या भूमिकेतून व्यक्त केलेली सावित्री व जिजाऊ.
कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेल्या महिला माता पालकांनी मुलींच्या या भूमिकेस प्रचंड दाद दिली आणि त्यांच्या वक्तृत्वातून मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन देखील स्वीकारले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका लता पालवे होत्या तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शकील बागवान, संतोष जमदाडे,राज जगताप, मेघा साळवे,संघमित्रा रोकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी श्रावणी राऊत,गायत्री काळे आणि वैष्णवी काळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन विद्यार्थी सार्थक गुंजाळ यांनी केले.