मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आशिया कप २०२२ मधल्या मानहानिकारक पराभवानंतर भारतीय संघ पुन्हा आज ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळण्यासाठी तयार झाला. पंजाबच्या क्रीडांगणावर ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताकडून सलामीला के. एल. राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा उतरले. रोहित झटपट धावा करण्याच्या प्रयत्नात ११ धावांवर हेझलवूडच्या चेंडूवर बाद झाला. पाठोपाठ विराट कोहली देखील दोन धावा काढून इलिसच्या चेंडूवर बाद झाला. विराट आता फक्त अफगाणिस्तान आणि हाँगकाँग विरुद्धच शतक आणि अर्धशतक झळकावू शकतो. दर्जेदार संघाच्या गोलंदाजां समोर त्याची बॅट म्यान होते. विश्वचषकात त्याला खेळवायचं की नाही याचा निवड समितीने पुनर्विचार करायला हवा.
असो. के. एल. राहुल आणि सुर्यकुमार यादव यांची जोडी चांगलीच जमली होती. दोघांनीही मैदानाच्या चारही दिशांना चेंडू टोलवत धावा जमवायला सुरूवात केली. बघताबघता राहुलने अर्धशतक पूर्ण केले. पण काही वेळातच तो हेझलवूडच्या चेंडूवर ५५ धावांवर बाद झाला. अर्धशतकाच्या जवळ पोहचलेल्या यादवला कॅमेरुन ग्रीनने ४६ धावांवर बाद केले. हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल दोन नवे फलंदाज खेळपट्टीवर असताना इलिसने पटेलला परतीचा रस्ता दाखवला. पांड्याने सामन्याची सूत्रं आपल्या हातात घेतली. चौकार आणि षटकार सहज पार होत होते. दिनेश कार्तिकही इलिसच्या चेंडूवर पायचीत झाला. हर्षल पटेल त्याच्याजागी आला. पण हार्दिक पूर्ण जोषात होता. त्याने २० व्या षटकाची सांगता सलग ३ षटकार मारत केली. त्याच्या नाबाद ७१ धावांच्या बळावर भारतीय संघ २०८/६ असं आव्हान उभं करू शकला.
प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या कर्णधार अारोन फिंचने भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच चेंडूवर षटकार लगावत त्यांच्या संघाचे इरादे स्पष्ट केले. तर उमेश यादवने टाकलेल्या सामन्याच्या दुसर्याच षटकात कॅमेरुन ग्रीनने सलग चार चौकार लगावत भारतीय संघाच्या आव्हानाची हवाच काढली. दोघेही तुफान फटकेबाजी करत असताना अक्षर पटेलने फिंचला २२ धावांवर बाद केलं. पण भारतीयांसाठी डोकेदुखी ठरणारा स्टिव्ह स्मिथ फलंदाजीसाठी आला. ग्रीन सोबत त्याने ७० धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने ग्रीनला ६१ धावांवर बाद केले. आणि ही भागीदारी संपुष्टात आली.
११व्या षटकांच्या सुरूवातीस १०९/२ अश्या भक्कम अवस्थेत ऑस्ट्रेलिया संघ होता. १२व्या षटकात उमेश यादवने पहिला स्मिथला ३५ धावांवर आणि ग्लेन मॅक्सवेलला एका धावेवर बाद करत ऑस्ट्रेलिया संघाला दणका दिला. ऑस्ट्रेलिया संघाला ४२ चेंडूंत ७५ धावांची गरज होती आणि दोन नवे फलंदाज खेळपट्टीवर होते. जोश इंग्लिश आणि टिम डेव्हिड. जोशला १७ धावांवर अक्षरने त्रिफाळाचित केले. यष्टिरक्षक मॅथ्यू वेड आणि टिम डेव्हिड एकमेकांना तोलामोलाची साथ देत होते. १२ चेंडूंत १८ धावा असं समीकरण झालं होतं आणि मॅथ्यू वेडने भुवनेश्वरच्या अखेरच्या षटकातले अखेरचे ३ चेंडू सिमापार पाठवले. त्याचवेळी त्यांची अर्धशतकी भागीदारी आणि संघाच्या २०० धावाही पार झाल्या. वेडने नाबाद ४५ धावा काढल्या.
जाताजाता यझुवेंद्र चहलने टिम डेव्हिडला १८ धावांवर बाद केलं. पण पुढच्याच चेंडूवर पॅट कमिन्सने चौकार मारत सामना ऑस्ट्रेलियाच्या नावे केला. ऑस्ट्रेलियाने हा सामना ४ गडी राखून जिंकला. अक्षर पटेल वगळता सगळ्याच गोलंजांना चांगलाच चोप मिळाला. भारतीय गोलंदाज सामना संपला तरी लय आणि टप्पा शोधत होते. कॅमेरुन ग्रीनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने २ षटकांत ४६ धावांमध्ये १ गडी बाद केला होता तर नंतर फलंदाजी करताना ८ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने ३० चेंडूंत उपयुक्त ६१ धावा काढल्या होत्या.
मालिकेतला दुसरा सामना २३ सप्टेंबर रोजी नागपूर येथे होणार आहे.
हे पण वाचा
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.