मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ऑस्ट्रेलियाला २-१ असे पराभूत केल्यानंतर आज साऊथ आफ्रिके विरुद्ध केरळच्या क्रीडांगणावर सामना झाला. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सलग तिसर्या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. साऊथ आफ्रिकेचा यष्टिरक्षक क्विंटन डीकॉक आणि कर्णधार टेंबा बावुमा यांनी खेळास सुरूवात केली. पण दीपक चहरने डावाच्या पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बावुमाचा शून्यावर त्रिफाळा उध्वस्त केला. पुढच्याच षटकात अर्शदीप सिंगने आफ्रिकेला धक्के दिले. पहिला डीकॉकचा त्रिफाळा उध्वस्त केला. रिली रोस्सोव आणि डेव्हिड मिलर यांनाही पाठोपाठ बाद केले. दीपक चहरने पुढच्याच षटकात ट्रिस्टन स्टब्स शून्यावर बाद केले.
आफ्रिकेचा अर्धा संघ ९ धावांवर परतला होता. एडन मार्कराम आणि वेन पारनेल यांनी डाव सावरण्यास सुरूवात केली. त्यांची भागीदारी होत असतानाच हर्षल पटेलने मार्करामला २५ धावांवर पायचीत टिपले. त्याच्याजागी केशव महाराज खेळपट्टीवर उतरला. भारतीय गोलंदाजांच्या तिखट मार्यासमोर दोन्ही फलंदाज संथगतीने फलंदाजी करू लागले. त्याचाच परिणाम म्हणून पारनेल २४ धावांवर अक्षर पटेलच्या चेंडूवर बाद झाला. केशव महाराजने सामन्याची सूत्रं आपल्या हातात घेत धावा जमवण्यास सुरूवात केली. रबाडाच्या साथीने त्याने ३३ धावांची भागीदारी रचली. त्याने ५ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने ४१ धावा काढल्या. त्याचा त्रिफाळा हर्षल पटेलने उध्वस्त केला.
२०व्या षटकाच्या अखेरीस साऊथ आफ्रिका केवळ १०६/८ इतकीच मजल मारू शकले. भारतीय गोलंदाजांनी आज टिच्चून मारा केल्यामुळे आफ्रिकेची दाणादाण उडाली. अर्शदीप सिंगने ३२/३, दीपक चहरने २४/२, हर्षल पटेल २६/ तर अक्षर पटेलने १६/१ गडी बाद केले. भारताकडून सलामीला के. एल. राहुल आणि कर्णधार रोहित शर्मा उतरले. भारतीय डावाची सुरूवात निराशाजनक झाली. रोहीत शर्माला रबाडाने त्याला शून्यावर बाद केले. ७व्या षटकात विराट देखील केवळ ३ धावांवर नॉर्टजेचा शिकार झाला. पुन्हा विराटने सगळ्यांची निराशा केली. त्याच्यासाठी भारतीय अ संघात जागा निर्माण करावी लागेल. दोन महत्वाचे फलंदाज बाद झाल्यामुळे आफ्रिकी गोलंदाज जोषात आले खरे पण त्यांचा जोष दीर्घकाळ टिकला नाही.
राहुल आणि यादव यांनी पद्धतशीरपणे फलंदाजी करत डावाला आकार दिला आणि अधिक पडझड होणार नाही याची दक्षता घेत आपआपले अर्धशतक झळकावले. त्यांनी तिसर्या विकेटसाठी नाबाद ९३ धावांची भागीदारी रचली. राहुलने २ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ५१ धावा काढल्या तर यादवने ५ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ५० धावा काढल्या. भारताने विजयी लक्ष्य पार करण्यासाठी १६.४ षटके फलंदाजी केली. सामनावीर पुरस्कारासाठी अर्शदीप सिंग, के. एल. राहुल आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चुरस होती. पण एकाच षटकात ३ गडी बाद करणारा अर्शदीप सिंग सरस ठरला. त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याने ३२/३ अशी निर्णायक कामगिरी बजावली होती. मालिकेतला दुसरा सामना २ ऑक्टोबर रोजी गुवाहाटीच्या क्रीडांगणावर सायंकाळी ७ वाजता सुरू होणार आहे.