जळगाव :- सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच ममुराबाद गावानजीक विदगाव रस्त्यावर धुळे जिल्ह्यातील आदिवासी पावरा जमातीच्या मजुरांना जळगावकडे घेऊन जाणाऱ्या प्रवासी गाडीचा सोमवारी सकाळी ७.३० वाजता भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटलेली सुसाट गाडी रस्त्यालगतच्या गटारीत उतरून झाडास धडकल्याने एका तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तीन जण जखमी झाले. याप्रकरणी अपघातास जबाबदार चालकाच्या विरोधात तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरपूर तालुक्यातील चांदसूर्या येथील रहिवासी जगदीश जंगलू पावरा याने जळगावच्या एमआयडीसीतील वेअर हाऊसमधील गोदामात मालगाडीतून गहू तसेच तांदूळ उतरवण्याचा ठेका घेतलेला होता. त्याकामासाठी चांदसूर्या येथीलच कांतिलाल हिरालाल पावरा, बुधिया जुगा पावरा, जयसिंग राजाराम पावरा, परम भय्या पावरा, रंजित उर्फ जयसिंग पावरा, गोकुळ वनसिंग पावरा, वांगज्या कालूसिंग पावरा आदींना ठेकेदार जगदीश पावरा हा वाडी येथील ज्ञानेश्वर पाटील यांच्या मालकीच्या प्रवासी गाडीने (क्रमांक एमएच-१८, बीआर ०८०६) सोमवारी सकाळी स्वतः घेऊन येत होता.
सकाळी ४.३० वाजता चांदसुरीया येथून निघालेल्या त्यांच्या प्रवासी गाडीला ममुराबाद गावानजीकच्या लक्ष्मीनगरासमोर ७.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला. परिसरात आधीच पाऊस पडलेला होता. त्यात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने नियंत्रण सुटलेली गाडी विरुद्ध दिशेला रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या गटारीत उतरली व झाडास तसेच विटांच्या भिंतीला धडकली.
अपघातात चालकाच्या बाजूला बसलेला कांतिलाल पावरा (वय २८) हा मजूर जबर मार लागल्याने जागीच गतप्राण झाला. रंजित पावरा, गोकूळ भील, वांगऱ्या पावरा हे तीन मजूर सुद्धा डोक्याला व मानेला मार लागल्याने जखमी झाले. या अपघातात प्रवासी गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. जळगावच्या जिल्हा रुग्णालयात दुपारी शवविच्छेदन केल्यानंतर मृत कांतिलाल पावरा याचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक फौजदार माणिक सपकाळे, साहेबराव पाटील, विलास सोनवणे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.