नाशिक (शौकतभाई शेख) अखिल भारतीय मुस्लीम-मराठी साहित्य संमेलन हे तब्बल २१ वर्षांनंतर नाशिकमध्ये आयोजित करण्यात आले असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तन्वीर खान (तांबोळी) यांनी दिली.
सदरील संमेलन हे दि. २५ ते २७ मार्च २०२२ दरम्यान नाशिकमध्ये होणार असुन,अखिल भारतीय मुस्लीम-मराठी साहित्य संमेलन आणि नाशिक अखिल भारतीय मुस्लिम- मराठी साहित्य व सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने १३ वे मराठी- मुस्लिम साहित्य संमेलन नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजित करण्यात आले आहे, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक तन्वीर खान (तांबोळी) यांची निवड करण्यात आल्याची माहिती काल झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
अखिल भारतीय मुस्लिम -मराठी साहित्य व संस्कृती संस्था नाशिक तथा अखिल भारतीय मुस्लिम- मराठी साहित्य व सांस्कृतिक मंडळ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक शहरात दिनांक २५ ते २७ मार्च २०२२ दरम्यान सदरील मुस्लिम-मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे.
सुप्रसिद्ध लेखक जावेद अख्तर अथवा सुप्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे तथा राज्यातील सर्व मुस्लिम आमदार आणि मुस्लिम-मराठी लेखक,साहित्यिक अशा एक हजार मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचेही तथा कोरोनाचे सर्व नियम पाळत हे संमेलन पार पडणार असल्याचेही तन्वीर खान (तांबोळी) म्हणाले.
सदरील पत्रकार परिषदेस प्रा.डॉ.फारुक शेख, उर्दूचे शायर जावेदअली सय्यद,हसन मुजावर, डॉ.लियाकत नामोले, रज्जाक दादा,सिरील अभंग,ताहेर शेख, आदी मान्यवर उपस्थित होते, सदरील संमेलनाचे आयोजन हे लोक सहभागाद्वारे निधी उभारुन केले जाणार असल्याचेही स्वागताध्यक्ष तन्वीर खान (तांबोळी) यांनी नमूद केले.या संमेलनाने मुस्लिम- मराठी साहित्य आणि साहित्यांत ऐकोपा निर्माण होऊन मोठी वैचारिक प्रगल्भता जोपासली जाणार असल्याचे शेवटी ते म्हणाले.