जळगाव :- शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ह्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त १ नोव्हेंबरपासून जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेऊन टीका करीत आहेत. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेतील वक्ते शरद विठ्ठल कोळी (रा. अर्धनारी, ता. माहोळ, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेण्याच्या कारणावरून जळगावात गुरुवारी ठाकरे गट व पोलीस आमनेसामने आले होते. पोलीस ठाण्यातच घोषणाबाजी करण्यात आली. शरद कोळी हे शिंदे गटातील नेत्यांवर प्रखर शब्दात टीका करत आहेत. त्यामुळे, त्यांना अटक होण्याची दाट शक्यता असल्याने ते नॉट रिचेबल असून अज्ञातस्थळी दाखल झाले आहेत.
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ह्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त १ नोव्हेंबरपासून जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेऊन टीका करीत आहेत. त्यांच्यासोबत युवा सेनेचे नेते शरद कोळी हे देखील आहेत. शरद कोळी यांनी केलेल्या भाषणावर गुलाबराव पाटील व त्यांच्या समर्थकांनी आक्षेप घेऊन गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जिल्हा बंदीचे आदेश काढण्याच्या आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यामुळे चोपडा येथील सभेला सुषमा अंधारे यांचं उशिराने आगमन झाले. यावेळेस सभा सुरू होण्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सध्या कायद्याचा दुरुपयोग केला जात असून सत्तेच्या दबावाखाली यंत्रणा आहे आणि दंडारश्याही आहे. एकीकडे गुन्हा दाखल होऊनही अटक होत नाही, आरोपींना हवेत गोळीबार करणाऱ्या सदा सरवणकर यांना सोडले जाते. हातपाय तोडण्याची भाषा करणारे प्रकाश सुर्वे यांच्यावर कारवाई केली जात नाही. मात्र, मागासवर्गीय शरद कोळी यांच्यावर जातीवादी कारवाई केली जात आहे, याचा आम्ही निषेध करतो असे सुषमा अंधारे म्हटले.
शरद कोळी नॉट रिचेबल
सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेत धरणगावात युवा सेनेचे विस्तारक शरद कोळी यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याविषयी वादग्रस्त व प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी कोळी यांना जिल्ह्यात भाषण करण्यावर बंदी आणली. तर दुसरीकडे धरणगावात त्यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. त्यानंतर, ते सध्य अज्ञातवासात असून नॉट रिचेबल आहेत. पोलीस दडपशाहीने कामकाज करीत असल्याचा आरोप करुन शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत, सुषमा अंधारे, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, महापौर जयश्री महाजन, महानगरप्रमुख शरद तायडे, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, गजानन मालपुरे यांच्यासह शिवसैनिक शरद कोळी यांच्यासोबत हॉटेल ते शहर पोलीस ठाणे चालत आले. रस्त्यावर पोलीस व सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
कोण आहेत शरद कोळी
ठाकरे गटाकडून शरद कोळी यांच्यावर युवासेनेचे राज्य विस्तारक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर शरद कोळी अत्यंत आक्रमक शैलीत ठाकरे गटाची बाजू मांडत असून ते सातत्याने शिंदे गटाच्या नेत्यांना अंगावर घेत आहेत. जळगाव जिल्ह्यातील महाप्रबोधन यात्रेत तर शरद कोळी यांनी शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर अत्यंत घणाघाती भाषेत टीका केली होती. यावर शिंदे गटाने आक्षेप नोंदवत पोलिसांना निवेदन दिले होते.
नेमकं काय घडलं?
गेल्या दोन दिवसात धरणगाव, पाचोरा येथे त्यांच्या यात्रेनिमित्त सभा झाल्या आहेत. धरणगाव येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील याच्या मतदार संघातही सभा झाली. या वेळी शरद कोळी यांनीही जोरदार भाषण केले. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यावर टीका करतांना कोळी यांनी गुर्जर समाजावर टीका केल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत समाजातर्फे जिल्हा पोलीस अधिक्षकांनाही निवेदन देण्यात आले होते.
याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शरद कोळी यांना जळगावात कुठेच भाषण करता येणार नाही, असा आदेश काढला. या प्रकरणी पोलीस त्यांना नोटीस बजावण्यास गेले होते. तेव्हा पोलीस शरद कोळी यांना ताब्यात घेण्याची शक्यता होती. मात्र, शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर हा बेत बारगळल्याचे समजते. पोलिसांचे आदेश झुगारून शहर पोलीस ठाण्याबाहेरून शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह शरद कोळी महापौरांच्या गाडीतून चोपडा येथे महाप्रबोधन सभेकडे रवाना झाले. शरद कोळी यांना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांनी चोपडा शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडावद येथे नाकाबंदी केली होती. चोपडाकडे निघालेल्या सुषमा अंधारे यांच्या ताफ्यातील वाहनांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली. मात्र, त्यावेळी शरद कोळी पोलिसांच्या हाती लागले नव्हते. ते पोलिसांना चकवा देऊन अज्ञातस्थळी रवाना झाल्याची चर्चा आहे.
हे वाचलंत का ?
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.