“स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ” परळ यांना सांघिक कार्यासाठी पुरस्कार
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “समाजातील ज्येष्ठ व्यक्तींसाठी कार्य करणे हा अत्यंत आनंदाचा आणि शिकण्याचा भाग असतो. आपणाला घडविलेल्या पिढीसाठी तो कृतज्ञतेने केलेला नमस्कार असतो.” ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याच्या प्रसंगी या शब्दात मा. सुप्रियाताई सुळे, कार्याध्यक्ष, यशवंतराव चव्हाण सेंटर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. हा आनंद मेळाव्याचा उपक्रम राज्यात सर्वत्र व प्रतिवर्षी आयोजित करण्यात येईल याची ग्वाही त्यांनी दिली. रविवार दि. ६ नोव्हेंबर, २०२२ रोजी ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याच्या प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मा. हेमंत टकले, कोषाध्यक्ष, यशवंतराव चव्हाण सेंटर हे होते.
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे मुंबईच्या माजी महापौर ॲड. निर्मलाताई सामंत-प्रभावळकर, मा. ॲड. जयमंगल धनराज, फेस्कोमेचे अध्यक्ष मा. शरद डिचोलकर यांची विशेष उपस्थिती होती. यशवंतराव चव्हाण सेंटर गेली १७ वर्षे ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्याचे आयोजन करीत आहे. या मेळाव्यात दोन ज्येष्ठ पुरुष कार्यकर्ते मा. श्री. शामशेठ गांगण, मा. श्री. विजय विनायक औंधे आणि दोन ज्येष्ठ महिला कार्यकर्ते मा. श्रीमती मीना आचार्य, मा. श्रीमती उषा झवेरी यांचा पुरस्कार देऊन, तसेच ‘स्वामी विरंगुळा ज्येष्ठ नागरिक संघ” परळ यांना सांघिक कार्यासाठी पुरस्काराने गौरवण्यात आले. श्री मोहन कटारे यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसहित या सन्मान पुरस्काराचा स्वीकार केला.
सुमारे ३०० ज्येष्ठ स्त्री- पुरुष या कार्यक्रमाला उपस्थित होते. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि ज्येष्ठ कलाकारांचा सांगितिक कार्यक्रम सादर करण्यात आला. याप्रसंगी मा. ॲड. निर्मलाताई सामंत-प्रभावळकर यांनी “इच्छापत्र” बद्दल कायदेशीर मार्गदर्शन केले. तसेच ज्येष्ठांचे समाजातील स्थान व योगदान याविषयी अनेक उदाहरणे देऊन मांडणी केली. सन्मानीय मा. सुप्रीयाताई सुळे यांच्या माध्यमातून ज्येष्ठांविषयीच्या धोरणात आवश्यक ते बदल होतील अशी आशा व्यक्त केली.
सेंटर चे विधीसल्लागार ॲड. जयमंगल धनराज यांनी “ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कायदा-२००७” ची माहिती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. हेमंत टकले यांनी साहित्य क्षेत्रातील अनेक व्यक्तींच्या आठवणी जागविल्या. कुसुमाग्रज यांच्या काव्याने त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. फेस्कॉमचे अध्यक्ष मा. शरद डिचोलकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करताना ज्येष्ठांनी घेण्यापेक्षा आपल्या जवळचे उत्तम ते देण्याचे आवाहन केले. सर्व उपस्थितांसाठी उत्तम भोजनाची व चव्हाण सेंटर मध्ये सुरु असलेले उपक्रम पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांचे स्वागत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीप्ती नाखले यांनी केले.