आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ‘वंध्यत्व निवारण शिबिरा’मुळे अनेक जोडप्यांची आई- बाबा होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वी वाटचाल!

Spread the love

तब्बल नऊ वर्षांनी दाम्पत्याला मिळाला आई बाबा होण्याचा आनंद.

कर्जत प्रतिनिधी- दिलीप अनारसे | कर्जत-जामखेडकरांसाठी पहिल्यांदाच आमदार रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था व डॉ. आशिष जळक व डॉ. प्रियांका जळक संचलित श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने वंध्यत्व निवारण शिबिराचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. या शिबिराला कर्जत जामखेडमधील अनेक अपत्यहीन जोडप्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल 100 हून अधिक जोडपे या शिबिरात सहभागी झाले होते. प्रत्येक स्त्रीची आपल्याला मातृत्त्व मिळावे ही सुप्त इच्छा असते. परंतु आजच्या आधुनिक जीवन शैलीमुळे, मानसिक तणावामुळे तसेच बदललेल्या आहारामुळे लग्नानंतर 1-2 वर्षांनंतरही अपत्यप्राप्ती न होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे.

आमदार रोहित पवार यांना मतदारसंघातील अपत्य प्राप्ती होत नसलेले अनेक जण भेटले तसेच त्यांनी वंध्यत्व निवारणाच्या उपचारासाठी कुठे बोलता येईल का? किंवा काही मदत करता येईल का या संदर्भात विचारणा केली. त्यानंतर सदरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च येतो याची जाणीव असल्याने आमदार रोहित पवार यांनी डॉ. जळक यांच्याशी संपर्क केला आणि डॉ. जळक यांनीही आमदार रोहित पवारांच्या विशेष विनंतीचा मान ठेवून कर्जत जामखेडमधील जोडप्यांसाठी अगदी माफक दरात हे उपचार आपल्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरद्वारे करण्याचे मान्य केले आणि कर्जत जामखेडमधील जोडप्यांना या शिबिराचा लाभ घेता आला.

जामखेडमधील एका छोट्याशा गावातील रोजंदारीवर काम करून घर चालवणाऱ्या कुटुंबातील जोडप्याला लग्नाच्या तब्बल 9 वर्षांनंतरही अपत्यप्राप्ती होत नव्हती. त्यांनी अनेक पद्धतीने प्रयत्न केले तसेच त्यांना महागडे IVF उपचार परवडत नव्हते, अखेर निराश झालेल्या या जोडप्याने आशेचा किरण दिसेल या हेतूने रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या वंध्यत्व निवारण शिबिरात सहभाग नोंदवला आणि त्यांना त्याचा फायदा झाला. अत्यल्प दरात त्यांचे IVF उपचार पार पडले व तब्बल 9 वर्षानंतर त्यांचं आई-बाबा होण्याचं स्वप्न पूर्ण झालं.

आयोजित वंध्यत्व निवारण शिबिरात सहभागी झालेल्या 100 जोडप्यांपैकी 25 जोडप्यांनी IVF उपचार पद्धतीने उपचार सुरू केले, त्यापैकी 20 पेक्षा अधिक जोडप्यांना पहिल्याच प्रयत्नात यश आल्याने त्यांची आता आई-बाबा होण्याच्या स्वप्नाकडे यशस्वी वाटचाल सुरू झाली आहे. तसेच या मोफत शिबिरात सहभागी झाल्याने या दाम्पत्यांची 1 ते 1.5 लाख रुपयांची बचत देखील झाली आहे. त्यामुळे या शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आमदार रोहित पवारांचे कर्जत जामखेडमधील दांपत्यांनी आभार मानले आहे.

टीम झुंजार