“सांगली जिल्ह्याच्या तासगांव तालुक्यातील सावळजमधील आर.आर.पाटील महाविद्यालयात श्रीरामपूर येथील मा.प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये यांचे व्याख्यान”
शिरसगांव (बाबासाहेब चेडे) – महाराष्ट्र राज्याची मराठी भाषा अनेक शब्दगुणांनी संपन्न आहे, तिला अतिप्राचीन अशी परंपरा आहे.तमिळी, सिंहली, संस्कृत, प्राकृत अशा प्राचीनतम भाषेतील ग्रन्थात मराठी भाषेतील संवाद, व्याकरण,नोंदी आहेत त्यामुळे मराठी भाषेला अभिजित भाषेचा दर्जा सहजपणे मिळणे गरजेचे आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्याच्या शिरसगांव येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. बाबुराव उपाध्ये यांचे सांगली जिल्ह्यातील तासगांव तालुक्यातील सावळज येथील श्री.रावसाहेब रामराव पाटील महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा उपक्रमाच्या अंतर्गत ‘मराठी भाषा आणि अभिजात दर्जा ‘या विषयावर दूरदर्शी माध्यमातून व्याख्यान आयोजित करण्यात आले, त्याप्रसंगी डॉ. बाबुराव उपाध्ये बोलत होते,अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. कुंडलिक एच. शिंदे उपस्थित होते. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. बलवंत मगदूम यांनी स्वागत व प्रास्ताविक करून पाहुणे व अध्यक्ष यांचा परिचय करून दिला. या व्याख्यान कार्यक्रमात माजी प्राचार्य टी. ई. शेळके,रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे,माजी प्रा.शिवाजीराव बारगळ, कवयित्री संगीताताई फासाटे,कवयित्री ऋता ठाकूर, कवयित्री सुजाता पुरी यांच्यासह पालक, ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी ‘आदर्श प्राचार्य ‘म्हणून प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे यांच्यावरील कविता सादर करून मराठी भाषा आणि तिच्यातील प्राचीमतम संदर्भ यांचे महाराष्ट्र शासन दैनंदिनी २०२२ अनुषंगाने विश्लेषण केले.२३०० ते २६०० काळातील तमिळीतील ‘संगम साहित्य ;२२५० काळातील पालिभाषेतील बौद्ध ग्रन्थ ‘विनयपिटीक’ , श्रीलंकेतील सिंहली भाषेतील ‘दीपवंश’ ‘महावंश’,२२३० वर्षांपूर्वीचा नाणेघाट शिलालेख,२००० पूर्वीचा ‘गाथा सप्तपदी’हा ५० शेतकरी कवींच्या ७०० मौलिक कवितांचा संग्रह २००० सालातील वररुचीचा ‘प्राकृत प्रकाश’, महाकवी कालिदासाचे ‘शाकुंतल’ नाटक, १२०० चे हरिभद्र यांची ‘समरदित्याची कथा ‘ही मराठी कादंबरी,महानुभाव लीळाचरित्र’, संतचरित्र,छत्रपती शिवराय काळातील ‘राजभाषा व्यवहार कोश ‘ आधुनिक साहित्य यांचे संदर्भ देत मराठी भाषेचे सामर्थ्य आणि प्राचीनतमता स्पष्ट केली. साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मानकरी १९७४चे वि. स. खांडेकर, १९८७चे वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज, २००३ चे वि. दा. करंदीकर, ३०१४ चे भालचंद्र नेमाडे यांचे साहित्यिक योगदान विशद करून मराठीची गुणवत्ता सांगितली. अशा सर्वोत्तम भाषेला अभिजित भाषेचा दर्जा लवकर मिळाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्राचार्य शेळके यांनी प्राचार्य उणउणे यांच्या आठवणी सांगितल्या, प्रा.शिवाजीराव बारगळ यांनी शुभेच्छा दिल्या. संगीता फासाटे यांनी शुभेच्छा देत त्यांनी अभिनय केलेल्या ‘गज्या’बालचित्रपटाची माहिती दिली.प्राचार्य डॉ. के. एच. शिंदे यांनी अध्यक्षीय मनोगतातून शासन परिपत्रकतील संदर्भ सांगत मराठी भाषेतील उपक्रम स्तुत्य असल्याचे स्पष्ठ करीत मराठी भाषेला वर्षभरातच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असे सांगितले.सूत्रसंचालन प्रा.मच्छगंधाली एन. तारळेकर यांनी केले. प्रा.संदीप कदम, प्रा.चंद्रकांत पाटील, पूजा चव्हाण, दत्तात्रय पाटील, प्रा.शिरसाठ, प्रा. जाधव आदी उपस्थित होते. प्रा. सचिन पी. सवने यांनी आभार मानले.