मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : टी२० विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पराभूत होऊन परतलेल्या कचखाऊ भारतीय संघाचे रथीमहारथी सध्या विश्रांती घेत आहेत. ज्या युवकांना विश्वचषकात संधी दिली पाहिजे होती ते आज न्यूझीलंड विरुद्ध मैदानात उभे ठाकले आहेत. मालिकेतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आज दुसर्या सामन्यात केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
डावाच्या ७व्या षटकात सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी आला आणि त्याने तडाखेबंद फटके खेळायला सुरुवात केली. न्यूझीलंडच्या कोणत्याही गोलंदाजाला त्याने स्थिरावू दिले नाही. संपूर्ण डावात त्याने दाखवून दिले की तो टी२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर का आहे.
सूर्यकुमार यादवने न्यूझीलंड विरुद्ध फक्त ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तो महत्त्वाचा क्षण समोर येताच सूर्यकुमारने आनंद साजरा केला आणि कर्णधार हार्दिक पंड्याने त्याला मिठी मारली. सूर्यकुमारचे हे दुसरे टी२० शतक आहे आणि योगायोगाने त्याचे पहिले शतक या वर्षीच इंग्लंडविरुद्ध झळकले होते. न्यूझीलंडविरुद्ध सूर्यकुमार यादवने ११ चौकार आणि ७ षटकार मारले. अखेरीस तो केवळ ५१ चेंडूत १११ धावा करून नाबाद राहिला. त्याने अवघ्या ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले होते. शेवटी त्याच्या खेळीने टीम इंडियाला २० षटकांत १९१/६ अशी मजल मारता आली. न्यूझीलंडसाठी टीम साऊदीने (३४/३) हॅटट्रिक घेतली. लॉकी फर्ग्युसन (४९/२) तर ईश सोधी (३५/१) साथ दिली.
प्रत्युत्तरादाखल उतरलेल्या न्यूझीलंड संघाला डावाच्या दुसर्याच चेंडूवर भुवनेश्वर कुमारने जबदस्त दणका दिला त्यातून ते सावरूच शकले नाहीत. कर्णधार केन विल्यमसनने ५२ चेंडूंत ६१ धावा काढल्या पण त्याला त्याच्या सहकार्यांकडून अपेक्षित साथ लाभली नाही. त्याने टी२० कारकिर्दीत १७वे अर्धशतक झळकावले. दीपक हुडाने २.५ षटकांत १० धावात ४ गडी बाद केले. त्याने टाकलेल्या वैयक्तिक तिसर्या तसेच सामन्याच्या अखेरच्या षटकात तीन गडी बाद केले. त्याची हॅटट्रिकची संधी थोडक्यात हुकली. युझवेंद्र चहल २६/२, मोहम्मद सिराज २४/२, वॉशिंग्टन सुंदर २४/१ यांच्या प्रभावी मार्यासमोर न्यूझीलंड संघ पार कोलमडला. आणि भारताने हा सामना ६५ धावांनी जिंकला.
सूर्यकुमार यादवला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मालिकेतला शेवटचा टी२० सामना २२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.