जळगाव :- जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते गाळण रेल्वेस्थानका दरम्यान पाटलीपुत्र या धावत्या एक्सप्रेसमधून एका परप्रांतीय तरुणा रेल्वेतून पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. गुलशन कुमार (वय २५ रा. शारदा प्रसाद, नुरपुर कासापुर, पो. छीतपालगढ, ता. प्रतापगड) असे मयत तरुणाचे नाव आहे. गुलशन हा त्याच्या लहान भावाला मुंबई दाखवण्यासाठी घेवून जात होता. मात्र, मुंबई पोहचण्यापूर्वी प्रवासात ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गुलशन कुमार हा आपल्या १३ वर्षीय भावाला मुंबई दाखवण्यासाठी घेवून जात होता. यासाठी तो प्रयागराज येथून पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये बसला. दरम्यान, रेल्वेने पाचोरा स्टेशन पार केल्यानंतर काही अंतरावरच गाळण रेल्वे स्थानकानजीक गुलशनचा पाय घसरला व तो रेल्वेतून खाली पडला. लहान भावाच्या डोळ्यादेखत ही घटना घडल्याने त्याने आरडाओरड करत प्रवाशांच्या मदतीने आपात्कालीन चैन ओढून रेल्वे थांबवली. रेल्वे थांबल्यानंतर गुलशनचा भाऊ रेल्वेतून उतरुन घटनास्थळी धावत गेला. मात्र, तोपर्यंत होत्याचे नव्हते झाले होते आणि गुलशनचा जागीच मृत्यू झाला होता. समोरचं दृश्य पाहून लहान भावाने जागीच हंबरडा फोडला.
या घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका घेत घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मयत गुलशन कुमारचा मृतदेह रुग्णवाहिका चालक अमोल पाटील, किशोर लोहार यांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हे वाचलंत का ?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






