जळगाव :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना मी सोडणार नाही, त्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवरायांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदींनी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानांमुळे निर्माण झालेलं वादंग अद्यापही संपलेलं नाही. त्यातच आता भाजपचे आमदार प्रसाद लाड वादात सापडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला असल्याचं वक्तव्य प्रसाद लाड यांनी केल्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा पेटलं आहे. यावरून अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय. अशातच आता शिंदे गटाचे सदस्य राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही लाड यांना घरचा आहेर दिला आहे.
नेमके काय म्हणाले ना.पाटील ?
छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा कुण्या मायच्या लालला अधिकार नाही. शिवरायांबद्दल कोणीही वाकड तिकडं बोलत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केलं जाणार नाही. शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाहीत. पुन्हा जर अवमान केला तर मंत्रीपद गेल खड्ड्यात यांना सोडणार नाही, असा इशाराच गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.
चार महिने झाले विरोधकांकडून सतत टीका सुरू आहे. आमच्या विकास कामांची जी गती आहे ती जनतेला आवडत आहे. आता मुख्यमंत्र्यांवर जे पैशांच्या उलाढालीचे गंभीर आरोप केले जात आहेत, त्याने जनतेचे पोट भरत नाही. मागच्या दरवाजांनी निवडून आलेल्या संजय राऊत यांना पुढच्या दरवाजाने कसे निवडून यायचं हे माहीत नसल्याने ते अशा पद्धतीने गंभीर आरोप करत आहेत, असा टोला त्यांनी राऊत यांना लगावला.
जिल्हा दूध संघाचे निवडणूक आदेश दोनच दिवसात पुन्हा बदलल्याने एकनाथ खडसेंनी ही लोकशाहीची टिंगल असून हा सरकारचा निर्लज्जपणा असल्याची टीका केली होती. या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. आदेश हे सरकारने काढले आहेत. मंत्री गुलाबराव पाटील यांनी काढलेले नाहीत. ते विरोधक असल्याने माझ्यावर टीकाच करतील. माझी आरती करतील का? असा चिमटा त्यांनी काढला
पहा व्हिडिओ :
छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला : प्रसाद लाड
छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असं वादग्रस्त विधान प्रसाद लाड यांनी केलं. त्यांच्या या विधानावर त्यांना करेक्ट करण्याचा प्रयत्न समोर बसलेल्या काही व्यक्तींनी केला. पण त्यानंतरही त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं नाही किंवा अनावधानाने बोललो, असंही म्हटलं नाही. एकीकडे राज्यपाल कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्या हकालपट्टीची मागणी जोर धरत असताना आता प्रसाद लाड यांनी केलेल्या वक्तव्याने भाजपची अडचण वाढणार आहे.
भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो : प्रसाद लाड
छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही, अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, अशी सारवासारव करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न प्रसाद लाड यांनी केला.
हे वाचलंत का ?
- दोघांचं एकमेकांवर प्रेम, घरच्यांनी लग्नाला दिली संमती लग्नाच्या एक रात्री आधी वर शिरला वधूच्या खोलीत, आणि………
- आजचे राशी भविष्य बुधवार दि. २७ नोहेंबर २०२४
- भरधाव वेगाने जाणा-या कारने रस्ता ओलांडत असलेल्या व्यक्तीस जोरदार धडक; उपचारादरम्यान मृत्यू.
- दोन गायी तीन गोवंश यांची निर्दयीपणे अवैध वाहतूक करणारे दोन वाहने जप्त. चौघांवर गुन्हा दाखल.
- वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात चालकासह एरंडोल येथील पायी चालणाऱ्याच्या मृत्यू.