मुंबई प्रतिनिधी
एकाही रुग्णालयात योजनेअंतर्गत अंगीकृत नसल्याने रस्ते अपघातग्रस्तींचे हाल, उपचारासाठी आर्थिक मदत मिळवताना होतेय दमछाक
मुंबई :- १६ सप्टेंबर २०२० च्या मंत्रिमंडळ बैठकीत रस्ते अपघात विमा योजना बाबतीत चर्चा होऊन ती योजना स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने १४ ऑक्टोबर २०२० रोजी अंमलबजवाणी देखील झाल्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. रस्ते अपघातातील जखमींना वेळेवर उपचार मिळून मृत्यू दर तसेच अपंगत्वाचे प्रमाण कमी होईल हा प्रामाणिक उद्देश सरकारचा होता व त्याबद्दल सरकारचे सर्व स्तरातून कौतुक देखील झाले.परंतु या योजनेला मंजुरी मिळून तब्बल १ वर्ष होऊन गेले तरी अद्याप एकही रुग्णालय या योजनेअंतर्गत जोडले नसल्याचे आढळून आले आहे. याबाबतीत रुग्णमित्र राजेंद्र ढगे गेली एक वर्ष सरकार कडे पाठपुरावा करत आहेत.
शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्यांपासून ते नेत्यांपर्यंत या रस्ते अपघात विमा योजने बाबत चर्चा केली, पण कुणालाही या योजनेची माहिती नसल्याचे आढळून आले. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना याबाबत विचारणा केली असता अजून कालावधी जाईल हेच उत्तर मिळते; जर योजनेला उशीर होईल तर मग तसे स्पष्ट लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम सरकारचे आहे. १४ ऑक्टोबर २०२० ला शासन निर्णय जाहीर करून नागरिकांची वाहवा घ्यायचा अट्टाहास का केलात? नागरिकांची दिशाभूल करून साहेबांच्या नावाने सरकार फसवणूक करत असल्याची खंत रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी व्यक्त केली.
हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती प्रीत्यर्थ शक्ती स्थळावर जाऊन पोस्टर द्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न रुग्ण मित्र राजेश ढगे यांनी केला. आता हिंदूह्रदयसम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ९६ व्या जयंती दिनानिमित्त शिवसेना भवन येथे जाऊन सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केला आहे. किमान आता तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात जातीने लक्ष देऊन ही योजना कार्यान्वित करून स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा प्रचार प्रसार जनजागृती करतील अशी अपेक्षा रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी व्यक्त केली आहे.