ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांचं निधन

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली आहे. लावणी आणि सुलोचना चव्हाण यांचे वेगळेच नाते होते. मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात त्यांनी एक वेगळीच भूरळ श्रोत्यांना घातली होती. त्यांच्या निधनाने संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पार्थिवावर आज ३ वाजता मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावलेली होती. याशिवाय काही शस्त्रक्रियाही झाल्याने आणि वाढलेल्या आजारपणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज (१० डिसेंबर) फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांची प्राणज्योत मालवली.

‘रंगल्या रात्री अशा’ सिनेमातील सुलोचना चव्हाण यांच्या लावण्या खूपच गाजल्या. ‘नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापूरची मला हो म्हंत्यात लवंगी मिरची’ ही लावणी प्रचंड गाजली. ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा..’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘कसं काय पाटील बरं हाय का?’ यासारख्या एकाहून एक लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या खर्जातल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या. याच वर्षी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. सुलोचना चव्हाण यांना महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेतर्फे २००९ चा राम कदम पुरस्कार, २०११ चा महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यांनी फक्त लावण्याच नाही, तर भजन, गझल, भावगीते आणि भक्तिगीतेदेखील गाऊन संगीताचं दालन समृद्ध केलं.

सुलोचना चव्हाण यांचा जन्म १३ मार्च १९३३ साली मुंबईतल्या गिरगाव येथे झाला. विवाहापूर्वी त्यांचं नाव सुलोचना महादेव कदम असं होतं. सुलोचना चव्हाण यांनी १९५३-५४ च्या सुमारास “कलगीतुरा” या चित्रपटासाठी राजा बढे यांनी गायलेल्या काही लावण्या गायल्या. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते “एस. चव्हाण” पुढे याच दिग्दर्शकाबरोबर त्यांचे लग्न झाले आणि सुलोचना कदम यांच्या सुलोचना चव्हाण झाल्या. फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुलोचना चव्हाण यांनी मराठी सोबतच भोजपुरी, हिंदी, गुजराती, तामीळ, पंजाबी आदी भाषांतील गीते त्यांनी गायिली. पण मराठी सिनेमांमधील लावणी त्यांची खरी ओळख ठरली. त्यासाठी ‘लावणीसम्राज्ञी’ हा किताब आचार्य अत्रे यांच्याकडून प्राप्त झाला. त्यांनी मराठीसह हिंदी, गुजराती आणि उर्दू भाषेतल्या नाटकांत भूमिका केल्या होत्या. मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता “श्रीकृष्ण बाळमेळा”. याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले.

बोर्डावरची लावणी माजघरात आणणाऱ्या सुलोचना चव्हाण यांच्या मोठ्या बहिणीने त्यांना कलाक्षेत्रासाठी प्रोत्साहन दिले. त्यांची मोठी बहीण स्वतः कलाक्षेत्रात नव्हती, पण सुलोचना चव्हाणांना नेहमी प्रोत्साहन देत असे. सुलोचनाने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नाही. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या. लग्नाआधी त्यांनी सुमारे ७० हिंदी सिनेमांमध्ये पार्श्वगायन केलं. महत्त्वाचं म्हणजे वयाच्या १०व्या वर्षापासून त्यांनी गायनाला सुरुवात केली. मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांत पार्श्वगायन केले आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत सहगायक मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. करियरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले. वयाच्या सोळाव्या वर्षी मन्ना डे यांच्यासोबत त्यांनी ‘भोजपुरी रामायण’ गायिलं. त्यांचे गझल गायन ऐकून बेगम अख्तर यांनी सुलोचना चव्हाण यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती. सुलोचनाबाईंच्या आयुष्यातील आठवणींपैकी ही एक अतिशय महत्त्वाची आठवण. सुलोचनाजींचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकून तर बेगम अख्तर यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. असे अनेक सन्मानाचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले.

हे पण वाचा

टीम झुंजार