भारताने बांगलादेशला २२७ धावांनी हरवले; पण मालिका २-१ ने गमावली, ईशांत किशन ने रचला इतिहास

Spread the love

मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय कर्णधार् रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बढती मिळालेल्या के. एल. राहुलने नाणेफेक गमावली आणि फलंदाजी स्वीकारावी लागली. पण ही गमावलेली नाणफेक भारताच्या पथ्यावर पडली. इशान किशनने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात जलद द्विशतक ठोकले. किशनने १३१ चेंडूत २१० धावा केल्या, तर विराट कोहलीने आपला वैयक्तिक रेकॉर्ड चांगला करताना ११३ धावा काढल्या. ऑगस्ट २०१९ नंतरचे त्याचे हे पहिले एकदिवसीय शतक ठरले. त्याचे हे एक दिवसीय क्रिकेट मधले ४४ वे शतक तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचे ७२वे शतक. त्याने रिकी पाँटिगला मागे टाकले. भारताने ५० षटकांत ८ बाद ४०९ धावांपर्यंत मजल मारली.

रोहित शर्माच्या दुखापतीमुळे संघात आलेल्या किशनने सर्वाधिक २४ चौकार आणि १० चौकार मारले. वॉशिंग्टन सुंदरनेही ३७ धावा केल्या. बांगलादेशकडून इबादत हुसेन (२/८०), शकीब अल हसन (२/६८), तस्किन अहमद (२/८९),  मेहदी हसन मिराझ (१/७६) आणि मुस्तफिझूर रहमान (१/६६) यांनी विकेट्स घेतल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०० धावा करणारा इशान किशन भारताचा चौथा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि विरेंद्र सहवाग हे तीन भारतीय ह्या यादीत आहेत. सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वात प्रथम दुहेरी शतक झळकावले होते. तर रोहित शर्माने ही अद्भुत धावसंख्या ३ वेळा पार केली आहे.

जागतिक एक दिवसीय क्रिकेट मध्ये रोहित शर्मा (२६४ श्रीलंका २०१४) धावांसह प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर मार्टिन गुप्तील (२३७ वेस्ट इंडिज २०१५), विरेंद्र सहवाग (२१९ वेस्ट इंडिज २०११), ख्रिस गेल (२१५ झिंम्बाब्वे २०१५), इशान किशन (२१० बांगलादेश २०२२), फखर झमान (२१० झिंम्बाब्वे २०१८), रोहित शर्मा (२०९ ऑस्ट्रेलिया २०१३ आणि २०८ श्रीलंका २०१७) आणि सचिन तेंडुलकर (२०० दक्षिण आफ्रिका २०१०) असे दुहेरी शतकवीर आहेत. ४०० पेक्षा धावा करण्यात भारत आणि दक्षिण आप्रिका संयुक्तपणे प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांनी प्रत्येकी ६ वेळा ही धावसंख्या पार केली आणि ६ वेळा विजयी ठरले.

प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा संघ ३४ षटकांत १८२ धावांत आटोपला, शकीब अल हसनने ५० चेंडूंत सर्वाधिक ४३ धावा केल्या. शार्दुल ठाकूर (३/३०) तर अक्षर पटेल (२/२२), उमरान मलिक (२/४३), वॉशिंग्टन सुंदर (१/२), महंमद सिराज (१/२७) आणि कुलदीप यादव (१/५३) यांनी बळी घेतले. शिखर धवन विरुद्ध जे रान उठवत आहेत त्यांना विराट कोहलीला अभय द्यावंसं का वाटतं, हा मोठा प्रश्न आहे. विराटला शतक करण्यासाठी ३ वर्षांपेक्षा जास्त काळ लागला आणि त्याचवेळी शिखरने आपली कर्णधार आणि फलंदाज म्हणून गुणवत्ता सिद्ध केली, हे ते का विसरत आहेत? खरंतर विराटच संघावर भार आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. कसोटी मालिकेत हे पुन्हा सिद्ध होईल. मेहदी हसनला मालिकावीर तर इशान किशनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. बांगलादेश विरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका १४ डिसेंबर पासून सुरू होत आहे.

टीम झुंजार