मुंबई : आपल्या गावाकडच्या पोलीस मित्रांच्या मदतीने अडीच किलो सोने लंपास करु पाहणाऱ्या ज्वेलर्समधील कामगाराला तसेच त्याच्या पोलीस मित्रांना ट्रोम्बे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ज्वेलर्समधील कामगाराने दोघा पोलीस मित्रांच्या मदतीने लुटल्याचा बनाव रचला होता. पण पोलिसांनी खाक्या दाखवताच कामगार पोपटासारखा बोलू लागला. पोलिसांनी जवळपास अडीच कोटी रुपयांचं सोनं तिघांकडून जप्त केलंय. सोन्याची डिलिव्हरी करणाऱ्या कर्मचाऱ्याने दोन लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने आपल्याच कंपनीच्या अडीच किलो सोन्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ट्रोम्बे पोलिसांनी या तिघांचा डाव उधळून लावत अडीच किलो सोने जप्त केलंय, ज्याची २ कोटी ४७ लाख ५० हजार इतकी किंमत आहे. ट्रोम्बे पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जातीये.
कसा रचला खेळ ,आणि पोलिसांनी उधडला डाव
सोन्याचा व्यापार करणारे राजेंद्र पवार यांच्याकडे नितीन पाटील हा शुद्ध सोने ज्वेलर्सकडे डिलिव्हरी देण्याचे काम करीत होता. दि ८ रोजी तो मंगलोरवरून अडीच किलो सोने घेऊन निघाला होता. परंतु त्या नंतर त्याचा फोन बंद येऊ लागला. त्यानंतर काहीच तासांनी त्याने आपल्याला कोणी तरी रेल्वे ट्रॅकवर आणून लुटले असल्याचे आपल्या मालकाला सांगितले. मालकाला काहीतरी बनाव असल्याची शंका आली.
या प्रकरणी ज्वेलर्स मालक राजेंद्र पवार यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ नितीन पाटील या कामगाराला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने रचलेला बनाव सांगण्यास सुरुवात केली.
आपल्या गावाकडचा पोलीस मित्र- ठाणे लोहमार्ग पोलीसमध्ये कार्यरत असलेल्या प्रभाकर युवराज नाटेकर आणि त्याचा पोलीस मित्र विकास भीमा पवार यांनी एकत्र येऊन कट रचला आणि ते सोने सांगलीला त्यांच्या गावी नेले. त्यानंतर तिघांनी मिळून बनाव रचला. कामगाराने देखील ठरलेल्या प्लॅननुसार मालकाला लुटल्याची स्टोरी सांगितली. पण पोलिसांनी खाक्या दाखवताच रचलेला बनाव नितीनने पोलिसांना सांगितला. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून त्यांनी लंपास केलेलं सोनं जप्त केलं आहे.