मुंबई (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या गेल्या १८ वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असलेल्यांना विश्रांती देणे तसेच विद्यमान अध्यक्षांची वैधानिक पदावर केंद्र सरकारने नियुक्ती केल्यामुळे नव्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी सदस्यांमध्ये एकच चुरस लागली आहे. ही निवडणूक २५ डिसेंबर रोजी होत असून त्याच्याकडे सर्वच सावरकरप्रेमींचे लक्ष लागले आहे.
हिंदुमहासभेने यासाठी कंबर कसली आहे.
हिंदुमहासभेचे ज्येष्ठ नेते दिनेश भोगले यांनी यापूर्वी या सर्वांचा दांभिकपणा सप्रमाण उघड केला आहे. त्याचाच प्रचार या निवडणूकीच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे तसेच कार्यवाह राजेंद्र वराडकर हे सुमारे १८ वर्षे एकाच पदावर असून त्यांनी विकेंद्रीकरण न केल्यामुळे स्मारक अधिकाधिक सदस्याभिमुख होण्यास अडचणी होत आहेत. त्यामुळे आता निवडणूक हीच एकमेव संधी असून लोकशाही मार्गाने सदस्यांमधून या पदावर कार्य करण्यासाठी उत्सुक असलेल्यांसाठी ही संधी आहे.
त्याचबरोबर त्यांचे मनमानी निर्णय हे संस्थेसाठी अहितकारक ठरले असून हे मुद्दे यंदाच्या निवडणूकीच्या प्रचारात असतील. विद्यमान समितीच्या अनेक गैरव्यवहाराच्या तक्रारी असून त्याचाही सोक्षमोक्ष लागावा आणि नव्या समितीने त्यांची चौकशी करावी, अशीही मागणी होत आहे.सध्याचे विद्यमान अध्यक्ष राष्टपतीच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय मानवाधिकार या वैधानिक समितीवर विशेष वार्ताहर म्हणून नियुक्त असल्यामुळे भविष्यात त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारे पक्षपात होऊ नये, या कारणास्तव त्यांनी या खासगी संस्थेवर पद भूषविणे हे औचित्याला धरून नाही.
त्यामुळे त्यांच्या जागी पुणे येथील सावरकर विचारवंत चंद्रशेखर साने यांचे नाव अध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. त्याचबरोबर बाळाराव सावरकर यांचे पुत्र व विद्यमान सहकार्यवाह यांचे नाव कार्याध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांच्यावरदेखील कार्यवाहसारख्या महत्वाच्या पदाची जबाबदारी असावी, तसेच अनेक वर्षे डावललेल्या हिंदुमहासभेला कोषाध्यक्षरुपाने पद दिले जावे, असाही स्मारकाच्या अनेक सदस्यांचा एक सूर आहे.