मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत बढती मिळालेल्या के. एल. राहुलने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी स्वीकारली. पण ही जिंकलेली नाणफेक भारताच्या पथ्यावर पडली नाही. १९.३ षटकांत भारताची अवस्था ३ बाद ४८ अशी झाली. त्यात सलामीवीर शुबमन गिल (२०), के. एल. राहुल (२२) आणि विराट कोहली (१) यांचा समावेश होता. पुन्हा विराट सपशेल अपयशी ठरला. तरीही निवड समिती आणि संघ व्यवस्थापन त्यालाच साथ देत आहेत. कोणत्याही खेळाडूपेक्षा नेहमीच खेळ महत्चाचा असतो, हे सारे विसरत आहेत. अजून किती काळ हा जागा अडवून बसणार आहे? चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांनी डाव सावरला. पण अर्धशतकाच्या समीप आलेला पंत ४६ धावांवर मेहदी हसनच्या गोलंदाजीवर त्रिफाळाचीत झाला. एकदिवसीय सामना असल्याप्रमाणे तो खेळत होता. त्याने चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकार मारले. त्याच्याजागी श्रेयस अय्यर आला. त्याने पुजाराला चांगली साथ दिली. पहिल्या दिवसाचा खेळ संपण्याच्या ५ षटकं अाधी पुजारा ९० धावांवर तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर त्रिफाळाचीत झाला. त्याने २०३ चेंडूंत ११ चौकार लगावले. त्याच्याजागी नाइट वॉचमन म्हणून अक्षर पटेल खेळपट्टीवर आला. पण दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर तो १४ धावांवर मेहदी हसनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. अय्यर नाबाद ८२ धावांवर खेळपट्टीवर आहे. भारताने पहिल्या दिवसाच्या ९० षटकांत २७८/६ अशी धावसंख्या उभारली.
बांगलादेशने शेवटच्या अर्ध्या तासात सामन्यात रंगत भरली. त्यामुळे उद्या भारतीय संघ किती काळ खेळपट्टीवर उभा राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. बांगलादेशसाठी तैजुल इस्लाम (८४/३), मेहदी हसन (७१/२) आणि खालेद अहमद (२६/१) यांनी गडी बाद केले. दुसर्या दिवसाची सुरूवात भारतीय संघासाठी अत्यंत निराशाजनक झाली. अय्यरने कालच्या धावसंख्येत केवळ चार धावांची भर घातली आणि ८६ धावांवर तो इबादत हुसैनच्या चेंडूवर त्रिफाळाचीत झाला. रवीचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादव यांनी भारताचा डाव दीर्घकाळ चालावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. त्यांनी ८व्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण अशी ९२ धावांची भागीदारी रचली. आणि भारताचा डाव दिवसाच्या दुसर्या सत्रात पोहचवला. पण अश्विन ५८ धावांवर बाद होताच. पुढच्याच षटकात यादव ४० धावा काढून बाद झाला. त्याच्या पुढच्या षटकात सिराज ४ धावा काढून परतला. उमेश यादव १५ धावांवर नाबाद राहिला. भारताचा डाव १३३.५ षटकांत ४०४/१० वर संपुष्टात आला. बांगलादेशसाठी मेहदी हसन (११२/४), तैजुल इस्लाम (१३३/४), खालेद अहमद (२६/१) आणि इबादत हुसैन (७०/१) यांनी गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल उतरलेला बांगलादेशचा संघ पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळत गेला. महंमद सिराजने पहिल्या चार फलंदाजापैकी नझमल हुसैन शांतो डावाच्या पहिल्याच चेंडूवर (०), लिटन दास (२४) आणि झाकीर हसन (२०) ह्या ३ जणांना बाद केले तर उमेश यादवने यासिर अली चौधरीला (४) धावांवर बाद केले. हे दोघे कमी होते म्हणून की काय कुलदीप यादवने बांगलादेशी फलंदाजांना पळता भूई थोडी केली. शाकिब अल हसन (३), नुरुल हसन (१६), मुशफिकर रहिम (२) आणि तैजुल इस्लाम (०) ह्या चौघांना त्याने बाद केले. बांगलादेश ३५ षटकांत १०२/८ अशा दयनीय अवस्थेत पोहचला. दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशचा डाव ४४ षटकांत १३३/८ अशा अवस्थेत पोहचला. मेहदी हसन (१६) आणि इबादत हुसैन (१३) धावांवर नाबाद होते. त्यांनी ९व्या विकेटसाठी ३१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदार केली. बांगलादेश अजूनदेखील २७१ धावांनी पिछाडीवर अाहे.
तिसर्या दिवसाची सुरूवात बांगलादेश संघासाठी अत्यंत निराशाजनक झाली. इबादत हुसैनने कालच्या धावसंख्येत केवळ चार धावांची भर घातली आणि १७ धावांवर तो कुलदीप यादवच्या चेंडूवर बाद झाला आणि ४२ धावांची ही भागीदारी संपुष्टात आली. अक्षर पटेलने मेहदी हसन (२५) चा अडसर दूर केला आणि बांगलादेशचा संघ ५५.५ षटकांत १५०/१० धावांमध्ये परतला. कुलदीप यादव (४०/५), महंमद सिराज (२०/३), अक्षर पटेल (१०/१), उमेश यादव (३३/१) यांनी टिच्चून गोलंदाजी करताना बळी मिळवले. बांगलादेश २५४ धावांच्या पिछाडीवर असतानाही भारताने त्यांना फॉलोऑन दिला नाही आणि फलंदाजीचा सराव करण्याची संधी घेतली. पण के. एल. राहुल (२३) संघाची धावसंख्या ७० असताना बाद झाला. शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजाराने पुढच्या २७ षटकांत ११३ धावांची भागीदारी रचली. शुबमन गिलने १० चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने १५२ चेंडूंत ११० धावा काढल्या. हे त्याचे कसोटी कारकिर्दीतले पहिले शतक ठरले. ह्यापूर्वी त्याने ४ अर्धशतकं झळकावलेली आहेत. चेतेश्वर पुजाराने १३ चौकारांसह १३० चेंडूंत नाबाद १०२ धावा काढल्या. जानेवारी २०१९ नंतर पुजाराने हे शतक झळकावले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतले सर्वात वेगवान शतक ठरले. पुजाराचे बांगलादेश विरुद्ध हे पहिले आणि कारकिर्दीतले १९वे शतक ठरले. आतापर्यंत बांगलादेश विरुद्धच्या ४ सामन्यांतल्या ६ डावांत त्याने ५ अर्धशतकं झळकावलेली आहेत. तर विराट कोहली १९ धावांवर नाबाद राहिला. भारताने दुसर्या डावात ६१.४ षटकांत २५८/२ अशी धावसंख्या उभारली आणि डाव घोषित केला. दोन दिवस बाकी असताना भारताने डाव घोषित करून खूप मोठा धोका पत्करला आहे. बांगलादेशला विजयासाठी ५१३ धावांची गरज आहे.
सामना वाचवण्यासाठी उतरलेल्या बांगलादेश संघाच्या सलामीवीरांनी १२ षटकांत बिनबाद ४२ धावा काढल्या. नझमल हुसैन शांतो नाबाद २५ तर झाकीर हसन नाबाद १७ धावांवर होते. बांगलादेशला पुढच्या दोन दिवसांचा मोठा काळ अजून ४७१ धावा काढण्यासाठी मिळाला आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात दोन्ही सलामीवीर योजनाबद्ध फलंदाजी करत होते. दोघांनीही आपली अर्धशतकं झळकावली. जेवणासाठी सामना थांबला तेव्हा नझमल हुसैन शांतो (६४) तर झाकीर हसन (५५) धावांवर नाबाद खेळत होते. त्यांनी ४२ षटकांमध्ये ११९ धावांची भक्कम भागीदारी रचली होती.
जेवणानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या नझमल हुसैन शांतोला उमेश यादवने ६७ धावांवर बाद केले आणि १२४ धावांची भागीदारी संपुष्टात आली. यासिर अली चौधरी खेळपट्टीवर उतरला पण अवघ्या ५ धावांवर अक्षर पटेलने त्याला त्रिफाळाचीत केले. लिटन दास फलंदाजीसाठी उतरला. त्याने झाकीर हसनच्या सोबतीने ४२ धावांची भागीदारी केली. कुलदीप यादवने त्याला १९ धावांवर बाद केलं. मुशफिकर रहिम झाकीर हसनच्या साथीला आला. चहापाणाकरता खेळ थांबला तेव्हा बांगलादेश ७१ षटकांत १७६/३ वर होता. झाकीर हसन ८२ तर मुशफिकर रहिम २ धावांवर नाबाद होते. बांगलादेशला विजयासाठी अजूनही ३३७ धावांची गरज आहे.
७६.२ षटकांचा खेळ झाला तेव्हा झाकीर हसनने कुलदीप यादवला सनसनीत षटकार लगावत बांगलादेशच्या २०० धावा पूर्ण केल्या. पदार्पणाच्या सामन्यातच झाकीर हसनने अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर जबरदस्त चौकार मारत आपलं नाबाद शतक झळकावलं. पण पुढच्याच षटकात रवीचंद्रन अश्विनने झाकीर हसनला बाद केलं आणि ३५ धावांची ही भागीदारी संपुष्टात आली. शाकिब अल हसनने आल्याआल्या चौकार आणि षटकाराने अक्षर पटेलचा समाचार घेतला. मुशफिकर रहिमला २३ धावांवर अक्षर पटेलने त्रिफाळाचीत केलं. नुरुल हसनला देखील त्याच षटकात अक्षरने ३ धावांवर परतीचा रस्ता दाखवला. आजचा खेळ संपला तेव्हा मेहदी हसन ९ आणि शाकिब अल हसन ४० धावांवर नाबाद होते. त्यांची ३४ धावांची भागीदारी भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी ठरली अाहे. १०२ षटकांत बांगलादेश २७२/६ पर्यंत पोहचला आहे. पाचव्या दिवशी त्यांना ९० षटकांत २४१ काढायच्या आहेत. अक्षर पटेल (५०/३), उमेश यादव (२७/१), कुलदीप यादव (६९/१) आणि रवीचंद्रन अश्विन (७५/१) यांनी गडी बाद केले. आज पुन्हा भारतीय गोलंदाजीची पीसं काढण्यात आली.
बांगलादेशने सामना पाचव्या दिवसापर्यंत नेला हाच त्यांचा एकप्रकारे विजय आहे. आज दिवसाच्या पहिल्या सत्रात जेमतेम १२ षटकांमध्येच बांगलादेशचा डाव ३२४ वर संपला. ४५ धावांची भागीदारी करून मेहदी हसन (१३) महंमद सिराजचा बळी ठरला. तैजुल इस्लामच्या साथीने शाकिब अल हसनने ३७ धावांची भागीदारी केली. १०८ चेंडूंत ६ चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने त्याने ८४ धावा काढल्या. त्याला कुलदीप यादवने त्रिफाळाचीत केले. त्यानंतर बांगलादेश कढून खेळपट्टीवर तग धरून उभा राहिल असा फलंदाज नसल्यामुळे अक्षर पटेल आणि कुलदीप यादवने त्यांचं शेपूट गुंडाळलं. अक्षर पटेल (७७/४), कुलदीप यादव (७३/३), उमेश यादव (२७/१), महंमद सिराज (६७/१) आणि रवीचंद्रन अश्विन (७५/१) यांनी गडी बाद केले.
कुलदीप यादवला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आलं. त्याने सामन्यात ८ गडी बाद केले आणि फलंदाजी करताना ४० धावा काढल्या. मालिकेतली दुसरी आणि शेवटची कसोटी २२ ते २६ डिसेंबर होणार आहे.