राज्य चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांचे नेते भाऊसाहेब पठाण यांच्यावर आनंदराव अडसूळ आणि साथीदारांकडून जीवघेणा हल्ला

Spread the love

अडसूळ आणि साथीदारांच्या अटकेसाठी कर्मचारी नेणार नागपूर विधिमंडळावर मोर्चा

एकाचा गळा दाबून जावे मारण्याचा प्रयत्न महिला कर्मचार्‍यास धमकावले कर्मचार्‍यांचे संतापाचे वातावरण हल्लेखोरांवर कारवाईची मागणी

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्यावर मंत्रालयाच्या परिसरात आकाशवाणी आमदार निवास येथे मंगळवारी (ता. २०) रात्री माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या साथीदारांनी जीवघेणा हल्ला केला. दी महाराष्ट्र मंत्रालय को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद चव्हाण यांचादेखील गळा आवळण्याचा प्रयत्न झाला, तर वरिष्ठ लिपिक संगीता मोरे यांनाही धमकावण्यात आले. याप्रकरणी चतुर्थश्रेणी कर्मचार्‍यांनी पुढील हस्तक्षेप केल्यामुळे भाऊसाहेब पठाण थोडक्यात बचावले. तसेच पोलिसांनाही लगेच पाचारण करण्यात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. आज सकाळी हा प्रकार समजल्यानंतर मंत्रालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी वर्गात खळबळ माजली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याप्रकरणी कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, नागपूर येथे विधिमंडळावर मोर्चा नेण्याचा निर्णय संतप्त कर्मचारी वर्गाने घेतला आहे.

दी महाराष्ट्र मंत्रालय को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत भाऊसाहेब पठाण यांच्या नेतृत्वाखालील एकता पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले. त्याचा राग मनात ठेवून वचपा काढण्याच्या हेतूने आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या साथीदारांनी या सोसायटीत आमची युनियन असून सभासदांची वर्गणी पतपेढीच्या मार्फत भरा तसेच दोघा कर्मचार्‍यांची संचालक मंडळावर नियुक्ती करा, अशी मागणी करत काल पतसंस्थेत येऊन वाद घालण्यास सुरूवात केली. या पतसंस्थेचे उपाध्यक्ष या नात्याने ते दैनंदिन कामकाजाचा आढावा घेण्यासाठी संस्थेत जात असतात. भाऊसाहेब पठाण आणि त्यांचे साथीदार दैनंदिन कामकाजाचा आढावा घेत असताना तिथे येऊन त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यावेळी युनियनची वर्गणी पतसंस्थेने भरणे नियमाबाह्य आहे ते करता येणार नाही तसेच दोघा कर्मचार्‍यांची संचालक मंडळावर नियुक्ती करण्याबाबत आगामी बैठकीत निर्णय घेऊ, असे सांगूनही हल्ला करण्याचा उद्देश्य असल्यामुळे आनंदराव अडसूळ यांनी काचेची बाटली भाऊसाहेब पठाण यांच्या अंगावर फेकून मारली. त्यामुळे त्यांना जबरदस्त मार लागला. तसेच त्यांच्या एका सहकार्‍याने पठाण यांच्यासमवेत असलेल्या प्रमोद चव्हाण यांचा गळा दाबला. या जीवघेण्या हल्ल्यामुळे सर्वजण हादरून गेले. त्यांनी लगेच पोलिसांना पाचारण केले आणि पोलिसांनी वेळीच पुढील अनर्थ टाळला.

हा हल्ला पूर्वनियोजित होता. कारण आनंदराव अडसूळ यांच्या समर्थकांनी ते येण्यापूर्वीच त्यांच्या स्वागतासाठी पुष्पगुच्छ आणून ठेवले होते. तसेच भाऊसाहेब पठाण हे येणार ही वेळदेखील त्यांना माहित होती. त्यामुळेच संध्याकाळी नेमके त्या वेळेत येणे तसेच रीतसर निवेदन न करता दादागिरीची भाषा करणे, अर्वाच्च शिवीगाळ करणे, अपशब्द बोलणे आणि कळस म्हणजे जीवघेणा हल्ला करणे, या प्रकारामुळे कर्मचारी वर्गात संतापाचे वातावरण असून आनंदराव अडसूळ यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर कडक कारवाई करण्याची कर्मचारी वर्गाची मागणी आहे. त्याचबरोबर संगीता मोरे यांनादेखील अर्वाच्च शब्दात बोलून धमकावण्यात आले असून त्याची दखल देखील राज्य महिला आयोगाने घ्यावी, अशीही समस्त महिला व पुरुष कर्मचारी वर्गाची मागणी आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ गुंड प्रवृत्तीचे असून त्यांनी सिटी बँकेत पैशाच्या फार मोठा घोळ करून केलेल्या अफरातफरीवरून तुरुंगवास भोगावा लागला आहे, हे प्रकरण या पतंसस्थेतून हकालपट्टी केलेले माजी महाव्यवस्थापक रामचंद्र तावडे यांच्या सूचनेनुसार हा हल्ल्याचा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. सदर दोन्ही व्यक्ती समाजासाठी घातक असून त्यांच्यापासून राज्य अध्यक्ष भाऊसाहेब पठाण आणि त्यांच्या सहकार्‍यांना जिविताचा धोका आहे. त्यामुळे त्यांना अटक करून कडक कारवाई व्हावी, अशी ही कर्मचार्‍यांची मागणी आहे.

याप्रकरणी महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मुख्य सचिव, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त, मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनादेखील कर्मचार्‍यांकडून निवेदन देण्यात आले आहे.

टीम झुंजार