दुर्दैवी घटना : प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू ; चिमुकल्याला मांडीवर घेऊन नातेवाईकांचे रुग्णालयावर ठिय्या आंदोलन.

Spread the love

जळगाव : – जळगावमध्ये प्रसूतीनंतर मातेचा मृत्यू झाल्याने नातेवाईंकांनी रुग्णालयावर आरोप केले आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाच्या मातेचा मृत्यू झाल्याचा नातेवाईकांनी आरोप केला आहे. नवजात बालकाला मांडीवर घेऊन बाळाच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले. मात्र, रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी नातेवाईकांना प्रकरणाच्या चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे.

प्रसूतीनंतर उपचार सुरू असताना जळगाव शहरातील समता नगरातील आरती विकास गवळी (२२ ) या विवाहितेचा मृत्यू झाल्याची गुरुवार, २२ डिसेंबर रोजी सकाळी घडली. विवाहितेचा मृत्यू जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप करत संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी बाळाला सोबत नातेवाईकांनी दुपारी १ वाजेच्या सुमारास नवजात बालकास मांडीवर घेत जिल्हा रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले. अधिष्ठात्यांकडून संबंधित डॉक्टरांवर कारवाईचे आश्वासन देण्यात आल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले.

समता नगरातील आरती गवळी यांना शनिवार, दि. १० डिसेंबरला दुपारी ४ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शिकाऊ डॉक्टरांनी सीझरद्वारे महिलेची प्रसूती केली. रात्रीच आरती यांचा रक्तदाब कमी होवून प्रकृती चिंताजनक झाली होती. ही माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना देऊन आरती यांना खाजगीमध्ये हलविण्याचा सल्ला दिला.

मात्र, आरती यांना सोपविण्यास डॉक्टरांनी तब्बल तीन ते चार तासांचा विलंब केला. त्यामुळे महिलेची प्रकृती अधिकच बिघडली. मध्यरात्री १ वाजता महिलेला खाजगी रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. गुरूवारी सकाळी आरती गवळी यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. यावेळी नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केल्याचे पहायला मिळाले.

आज दुपारी १ वाजेच्या सुमारास आरती हिचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणून शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप केला. तसेच महिलेचे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन व्हावे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संतप्त नातेवाईकांनी जन्मलेल्या बाळाला मांडीवर घेत आंदोलन केले.

आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली हे ठिय्या आंदोलन झाले. रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेवून चौकशी करतो असे आश्वासन दिले. तसेच धुळे येथे इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याच्या सूचना केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार