धरणगावजवळ पकडला २३ लाख ५४ हजाराचा गुटखा ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल,एकाला अटक, मुख्य गुटका तस्करांच्या शोध सुरू!

Spread the love


मध्यरात्री चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांची कारवाई ! संशयित आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी ; मुख्य गुटखा तस्कराचा शोध सुरु, अवैध विक्री करणाऱ्यामध्ये खळबळ !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील रोटवद गावाजवळ चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांच्या पथकाने साधारण २४ लाखांचा गुटखा (vimal gutakha) पकडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. गुटखा भरलेली आयशर एरंडोलकडून चोपडा जात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे.

सापळा रचून पकडले वाहन
चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांना गोपनीय खबर मिळाली होती की, आयशर गाडी भरून मोठ्या प्रमाणात केसरयुक्त विमल पान मसाला अर्थात विमल गुटख्याची तस्करी होणार आहे. त्यानुसार एसडीपीओ रावले यांनी आपल्या पथकासह सापळा रचत रोटवद गावाजवळ दि.२३ डिसेंबर रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास आयशर गाडी अडवली. वाहनाची तपासणी केली असता त्यात तब्बल २३ लाख ५४ हजार ६०० रुपयाचा गुटखा मिळून आला. तर चालकाची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव राधेशाम संजय रघुवंशी (रा.पिंपळकोठा),असे सांगितले.ड्रायव्हर व गाडी मालक , या दोघांविरुद्ध पो.ना.चंदूलाल सोनावणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि जिभाऊ पाटील हे करीत आहेत.

यांनी केली कारवाई
चोपडा विभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वात ही कारवाई पो.नी. राहुल खताळ आणि पो.ना.चंदूलाल सोनावणे, रवी पाटील, नाना ठाकरे, पो काॅ प्रवीण पाटील,संदीप पाटील, शाम भिल, करीम सय्यद, मिलिंद सोनार, मिलिंद संदानशिव यांनी केली. पोलिसांनी २३ लाख ५४ हजाराचा गुटखा आणि ८ लाखाचे वाहन असा एकूण ३१ लाख ५४ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संशयित आरोपीला ४ दिवसांची पोलीस कोठडी !
दरम्यान, अटकेतील संशयित आरोपी रघुवंशी याला धरणगाव न्यायालयात हजर केले असता त्याचा चार दिवसांनी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर दुसरीकडे गाडी तथा गुटखा मालक याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. या कारवाईमुळे गुटखा माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

टीम झुंजार