भारताचा बांगलादेशवर ३ गडी राखून विजय भारताने कसोटी मालिका २-० अशी जिंकली

Spread the love

मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : मालिकेतली दुसरी आणि शेवटची कसोटी २२ डिसेंबर पासून ढाक्यातील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर सुरू झाली. पहिल्या दिवसाच्या खेळात भारत भक्कमपणे आघाडीवर राहिला, पण बांगलादेशला हे माहित आहे की दुसर्‍या दिवशी लवकर विकेट्स घेऊन ते पुन्हा सामन्यात परत येऊ शकतात. बांगलादेशने नाणेफेक जिंकली आणि फलंदाजी स्वीकारली. पण ही जिंकलेली नाणफेक त्यांच्या पथ्यावर पडली नाही. बांगलादेशची चहापानावर पाच विकेट्स पडून अवघड स्थिती होती आणि तेथून त्यांचा संघ केवळ २२७ धावा जमा करू शकला. मोमिनुल हकच्या (८४) धावा काढण्याच्या सर्वतोपरी प्रयत्नांना अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही. विशेषतः मेहदी हसन मिराझ आणि नुरुल हसन यांनी प्रचंड निराशा केली. मुशफिकर रहिम (२६), लिटन दास (२५), नझमल हुसैन शांतो (२४), शाकिब अल हसन (१६), झाकीर हसन (१५) आणि मेहदी हसन मिराझ (१५) यांनी सहयोग दिला.

अश्विन आणि उमेश यादव यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करत उर्वरित पाच बांगलादेशी विकेट्स घेतल्या. फलंदाजांनी खेळण्यासाठी निवडलेल्या काही चुकीच्या फटक्यांमुळे त्यांना मदत झाली. खराब फटका मारून बाद होण्यापूर्वी मेहदी हसन मिराझची तब्येत थोडीशी अस्वस्थ होती. त्याने मैदानाबाहेर जाऊन पूर्ण उपचार घेण्याचे ठरवले असते, तर पुन्हा फलंदाजीची गरज भासल्या नंतर तो कदाचित जास्त वेळ फलंदाजी करू शकला असता. नुरुल हसनची फलंदाजी यजमानांसाठी चिंतेचा विषय आहे. त्याच्याकडे वेगवान आणि फिरकी या दोन्ही प्रकारच्या गोलंदाजांवर हुकूमत गाजवण्याचं तंत्र नाही. मोमिनुल अधिक वेळ दुसऱ्या टोकाला अडकून पडला होता आणि भारतीय गोलंदाजांनी आपलं कौशल्य पणाला लावलं होतं.भारत फलंदाजीला आला तेव्हा सूर्यप्रकाश झपाट्याने कमी होत होता. शुभमन गिलने खेळलेले काही फटके अनावश्यक होते. तस्किन अहमद आणि शकीब अल हसन या दोघांनीही काही अप्रतिम षटकं टाकली. राहुलला शकीबच्या गोलंदाजीवर पायचीत बाद देण्यात आले होते, पण गिलचा सल्ला घेऊन घेतलेल्या रिव्ह्यूमुळे तो वाचला. भारताने दिवसाचा खेळ संपला तेव्हा ८ षटकांत बिनबाद १९ धावा केल्या.

खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नाही. फिरकीपटूंसाठी बरेच काही ह्या खेळपट्टीत आहे आणि वेगवान गोलंदाजांना सीममधून फलंदाजांना विचलित करण्यासाठी साथ मिळत आहे. त्यामुळे भारताला फटक्यांची निवड करताना काळजी घ्यावी लागेल. पहिल्या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे उमेश यादवची कसोटी क्रिकेटमधील कारकिर्दीतील चौथी सर्वोत्तम आकडेवारी – १५ षटकांत ४/२५ तर अश्विनने १६ षटकांत ४/७१ आणि अर्थातच १२ वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन झालेल्या जयदेव उनाडकटचे आहे. त्यानेही चांगली गोलंदाजी करत ५०/२ गडी बाद केले. दुसर्‍या दिवसाची सुरूवात चाचपडत खेळणार्‍या राहुल (१०) च्या पतनाने झाली. तैजुल इस्लामनेच त्याच्या पुढच्या षटकात गिललाही (२०) तंबूचा रस्ता दाखवला. चेतेश्वर पुजारा आणि कोहली डाव सावरतील अशी अपेक्षा असताना पुजारा (२४) धावांवर तैजुल इस्लामच्या चेंडूवर बाद झाला. जेवणासाठी खेळ थांबला तेव्हा भारताने ३६ षटकांमध्ये ८६ धावांमध्ये ३ गडी गमावले होते. चेतेश्वर पुजारा ७००० धावा पार करणारा भारताचा आठवा फलंदाज ठरला.

तर पुढच्या काही षटकांत कोहली (२४) तस्कीन अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. भारताची धावसंख्या तेव्हा ४/९४ अशी होती. भारताच्या १०० धावा होण्यासाठी ४० षटकं लागली. ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी आक्रमण हेच बचावाचं साधन बनवलं आणि गोलंदाजांचा येथ्येच्छ समाचार घेतला. ४८वे षटक भारतासाठी खूपच महत्वाचे ठरले. भारताच्या १५० धावा आणि पंतने बांगलादेश विरुद्धचे पहिले अर्धशतक झळकावले. पंतने ४९ चेंडूंत ५ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ५० धावा पूर्ण केले. त्याचवेळी अय्यरसोबत ५० धावांची भागीदारीही रचली. तर ५६.५ षटकांत दोघांनी शतकी भागीदारी रचली. त्यासाठी पंतने चौकार लगावला. आणि पुढच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताच्या २०० धावा पूर्ण केल्या. डावाच्या ५८.३ षटकांत अय्यरने ६० चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने कारकिर्दीतले ५वे अर्धशतक झळकावले. उपस्थित दर्शकांना कसोटी सामन्या दरम्यान एक दिवसीय सामन्यातल्या फलंदाजीचा अानंद लुटता येत आहे.

दीर्घकाळ चाललेली १५९ धावांची ही भागीदारी अखेरीस मेहदी हसनने भेदली. ऋषभ पंतला ९३ धावांवर त्याने बाद केलं. पंतने १०४ चेंडूंत ७ चौकार आणि ५ षटकार लगावले होते. त्यानंतर अवघ्या पाचव्या षटकात श्रेयस अय्यरला ८७ धावांवर शाकिब अल हसनने बाद केले. त्याने १०५ चेंडूंत १० चौकार आणि २ षटकार लगावले. ७२.४ षटकांत भारताची धावसंख्या ७/२७१ अशी होती आणि उरलेले फलंदाज गोलंदाजांच्या तालावर नाचत झटपट बाद झाले. ८६.३ षटकांत भारताचा डाव ३१४ धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत भारताच्या धावांवर अंकुश ठेवला. त्यात प्रामुख्याने तैजुल इस्लाम (७४/३), शाकिब अल हसन (७९/४), तस्किन अहमद (५८/१) आणि मेहदी हसन (६१/१) यांनी गडी बाद केले. बांगलादेशच्या दुसर्‍या डावात नझमल हुसैन शांतो (५) आणि झाकीर हसन (२) यांनी सावध सुरूवात केली. दिवस संपताना त्यांनी ६ षटकांत ७ धावा जमा केल्या. ते अजूनदेखील ८० धावांनी पिछाडीवर आहेत. सामन्याचे दिवस बाकी आहेत. बांगलादेश किती काळ खेळपट्टीवर तग धरून उभे राहणार ह्यावरच सामन्याचा निकाल अवलंबून आहे.

तिसर्‍या दिवसाच्या दुसर्‍या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अश्विनने नझमल हुसैन शांतो (कालच्याच ५) धावांवर पायचीत टिपले. महंमद सिराजने मोमिनुल हक अधिक संधी न देता ५ धावांवर बाद केले. शाकिब अल हसन (१३) जयदेव उनाडकटच्या जाळ्यात अडकला. मुशफिकर रहिमला (९) धावांवर अक्षर पटेलने पायचीत टिपले. ३१.१ षटकांत बांगलादेश ४/७० अशा दयनीय अवस्थेत पोहचला होता. लिटन दासच्या साथीने झाकीर हसनने ३२ धावांची भागीदारी रचली आणि वैयक्तिक ५१ धावांवर उमेश यादवचा बळी ठरला. मेहदी हसनला शून्यावर अक्षर पटेलने पायचीत टिपले. लिटन दासच्या साथीने नुरुल हसनने ४६ धावांची भागीदारी रचली आणि वैयक्तिक ३१ धावांवर अक्षर पटेलचा बळी ठरला. तस्किन अहमद आणि लिटन दासने आक्रमक फलंदाजी करत झटपट ६० धावांची भागीदारी रचली आणि लिटन दास ७ चौकारांसह ९८ चेंडूंत ७३ धावांवर महंमद सिराजच्या चेंडूवर त्रिफाळाचीत झाला. पुढचे दोन फलंदाज अवघ्या बारा धावांची भर घालून तंबूत परतले. तस्किन अहमद ३१ धावांवर नाबाद राहिला. आततायी फलंदाजी करून बांगलादेशच्या फलंदाजांनी सामना वाचवण्याची संधी गमावली. हा कसोटी सामना आहे हेच ते विसरून गेले होते. ७०.२ षटकांत बांगलादेश संघ २३१ धावांवर तंबूत परतला होता. भारताला विजयासाठी १४५ धावांचं लक्ष त्यांनी दिलं होतं. अक्षर पटेल (३/६८), महंमद सिराज (२/४१), अश्विन (२/६६), जयदेव उनाडकट (१/१७) आणि उमेश यादव (१/३२) यांनी गडी बाद केले.

विजयी लक्ष गाठण्यासाठी उतरलेल्या भारतीय सलामीवीरांना चेंडू कसा टोलवायचा हेच कळत नव्हते. कर्णधार के. एल. राहुल पुन्हा अपयशी ठरला. त्याला शाकिब अल हसनने अवघ्या दोन धावांवर बाद केलं. त्याच्याजागी आलेल्या पुजाराला (६) मेहदी हसनने बाद केले. गिललाही (७) त्यानेच तंबूचा रस्ता दाखवला. रात्रीचा पहारेकरी म्हणून आलेला अक्षर पटेल संयमीत फलंदाजी करत असताना विराट कोहलीने पुन्हा आततायीपणा केला आणि एका धावेवर मेहदी हसनचा तिसरा बळी ठरला. कोहलीला आता खरंच विश्रांतीची गरज आहे. त्याच्यामुळे संघावर अतिरिक्त भार पडत आहेच आणि गुणी खेळाडूंना संधीसाठी वाट पाहावी लागत आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा अक्षर पटेल (२६) तर जयदेव उनाडकट (३) धावांवर होते. भारताच्या खात्यावर २३ षटकांत ४५/३ धावा जमा झाल्या होत्या. पुढच्या दोन दिवसांत भारतीय संघाला विजयासाठी १०० धावा काढायच्या आहेत तर बांगलादेशला ६ विकेटची गरज आहे.

चौथ्या दिवसाची सुरूवात भारतासाठी निराशाजनक झाली. जयदेव उनाडकट कालच्या १० धावा जोडून शाकिब अल हसनच्या चेंडूवर १३ धावांवर पायचीत झाला. मेहदी हसनने ऋषभ पंतचा (९) काटा काढला. रात्रीचा पहारेदार म्हणून आलेला आणि बांगलादेशची डोकेदुखी ठरू पाहणार्‍या अक्षर पटेलला (३४) मेहदी हसनने त्याचा त्रिफाळा उध्वस्त केला. मेहदी हसनने ह्या डावात हा ५ वा बळी ठरला. २९.३ षटकांत भारताचा डाव ७/७४ अशा बिकट परिस्थितीत पोहचला. अजून जवळपास निम्मा प्रवास पार करायचा होता आणि खेळपट्टीवर दोन नवे फलंदाज होते. श्रेयस अय्यर आणि अश्विन यांनी अधिक नुकसान होणार नाही याची काळजी घेत विजयाला गवसणी घातली. श्रेयस अय्यरने ४६ चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद २९ आणि अश्विनने ६२ चेंडूंत ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४२ धावा केल्या. अश्विनने विजय साकारताना लागोपाठच्या चेंडूंवर दोन जबरदस्त चौकार लगावले. ७१ धावांची ही भागीदारी भारतीय संघासाठी बहुमूल्य ठरली. ४७ षटकांत ७/१४५ विजयी धावसंख्या ३ गडी राखून पार केली. बांगलादेशी गोलंदाजांना ही जोडी भेदता आली असती तर सामन्याचा निकाल वेगळा लागू शकला असता. पण मेहदी हसन (५/६३) आणि शाकिब अल हसन (२/५०) यांनी विजयाची कवाडं काही काळासाठी उघडी केली होती पण त्यांना इतर गोलंदाजांची अपेक्षित साथ लाभली नाही. रविचंद्रन अश्विनला सामनावीर तर चेतेश्वर पुजाराला मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. भारत विरुद्ध श्रीलंका टी२० मालिका ३ जानेवारी पासून सुरु होणार आहे.

टीम झुंजार