धुळे : – सघ्या महाराष्ट्रात लुटमार झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच दूरच्या प्रवासाहून परतत असताना रात्र झाल्यास एखाद्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करून अनेकजण आराम करत असतात. मात्र, असे आराम करणे काही जणांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही. असेच उज्जैनहून देवदर्शन करून परतणाऱ्या प्रवाशांनी रात्री झोपण्यासाठी आपली कार आर्वी शिवारात असलेल्या पेट्रोल पंपाजवळ उभी केली होती. गाडीतील प्रवासी झोपलेले असताना अचानक मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या वाहनावर दरोडेखोरांनी तुफान हल्ला चढविला. त्यावेळी पुण्याच्या रेखाचित्रकारासह सह प्रवाशांना दरोडेखोरांनी मारहाण केली. तसेच चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील रोकड, मोबाईल, सोन्याचे पदक यांसह किंमती वस्तू लुटत घटनास्थळावरुन पोबारा केला असल्याची घटना घडली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसही चक्रावले होते. दरोडेखोरांचा छडा लावण्यासाठी धुळे तालुका पोलिसांसह धुळे एलसीबीने तपासाची चक्रे वेगात फिरविण्यास सुरुवात केली. परिणामी, अवघ्या आठ ते नऊ तासांतच लुटमार करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात अखेर धुळे एलसीबीला यश आले आहे. धुळे पोलिसांनी तिघा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या असून टोळीतील उर्वरित तिघांचा देखील तपास युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.

दरोडेखोर हे मध्यप्रदेशाच्या दिशेने पसार होत असल्याची खात्रीशीर माहिती धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळताच त्यांनी पथकाला सापळा रचण्याच्या सूचना केल्या. संशयित दरोडेखोरांचे वाहन MH 14 BX 1573 हे मध्यप्रदेशातील सेंधवाकडे जात असताना त्यांना हाडाखेड गावाजवळच अडविण्यात आले. यावेळी पोलिसांनी संशयितांना वाहनासह ताब्यात घेवून त्यांची विचारपूस केली. त्यांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी अन्य साथीदारांसह आर्वीजवळील लुटीची कबूली दिली.
या दरम्यान पोलिसांनी राजेश परशुराम राठोड (३१), जगदिश शिवाजी पवार (१९), योगेश शंकर पवार (३४) यांना जेरबंद केले आहे. राठोड हा नांदेडमधील मुखेडच्या माजरी तांडा येथील रहिवासी आहे. तर, जगदिश पवार हा नांदेडमधील मुखेडच्या कमलेवाडीचा आहे. तसेच योगेश पवार हा मुखेडच्या बेळी येथील रहिवासी आहे. या लुटीच्या वेळी त्यांच्यासह अंकुश डेम्पू पवार, सलीम आणि छोटू या टोळीतील साथीदारही गुन्ह्यात सहभागी होते. ते शिरपूर येथून खाजगी बसने औरंगाबादला रवाना झाल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. त्यांचा देखील पोलिस कसून तपास पोलिस करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी यावेळी दिली.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






