एरंडोल,पारोळा,भडगांव तालुक्यातील गावांचा पोकरा योजनेत समावेश होणार.-आमदार चिमणराव पाटील, अधिवेशनात मांडला प्रश्न.पहा व्हिडिओ

Spread the love

एरंडोल- शेतक-यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणा-या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत (पोकरा) टप्पा क्रमांक दोनमध्ये एरंडोल मतदार संघातील एरंडोल,पारोळा आणि भडगाव तालुक्यातील राहिलेल्या गावांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.नागपूर येथील विधानसभेच्या अधिवेशनात आमदार चिमणराव पाटील यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे प्रश्न उपस्थित करून मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यात सदरची योजना सुरु करण्याची मागणी केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोकरा टप्पा क्रमांक दोनला मंजुरी मिळाली असून मराठवाडा,विदर्भ यासह जळगाव जिल्ह्यातील उर्वरित गावांचा या योजनेत समावेश करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.या योजनेसाठी सहा हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.दरम्यान आमदार चिमणराव पाटील यांनी शेतक-यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवून शेतक-यांना न्याय मिळवून दिल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून व्यक्त केली जात आहे.आमदार चिमणराव पाटील यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला

पहा व्हिडिओ

होता.पोकरा टप्पा क्रमांक एक योजनेत एरंडोल, पारोळा, भडगाव तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक गावे या योजने पासून वंचित असल्याचे शासनाच्या लक्षात आणून दिले. या योजनेच्या माध्यमातून शेतक-यांना मोठा लाभ होत होत असून त्यांची आर्थिक प्रगती काही प्रमाणात सुधारली आहे.या योजनेत ठीबकसाठी सुमारे ऐंशी टक्के अनुदान मिळत असते.टप्प क्रमांक एक मधील अनेक लाभार्थ्याना अद्यापपर्यंत अनुदान मिळालेले नाही,सदरचे अनुदान त्वरित देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. शेतक-यांच्या जिवनात क्रांती घडवण्यात महत्वाची भूमिका असणा-या पोकरा योजनेत एरंडोल मतदार संघातील राहिलेल्या गावांसह जिल्ह्यातील सुमारे आठशे गावांचा समावेश करून दुष्काळग्रस्त शेतक-यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली.

एरंडोल व पारोळा हे दोन्ही तालुके अवर्षण प्रवण (डीपीएपी)अंतर्गत असून दोन्ही तालुक्यात शेतक-यांच्या आत्महत्यांचे प्रमाण जास्त असल्याचे सांगितले.शेतक-यांच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर पोकरा योजनेत मतदार संघातील गावांचा समावेश करण्याची मागणी केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.तसेच पोकरा टप्पा क्रमांक दोनला मंजुरी मिळाली असून या योजनेत मराठवाड्यातील आठ,विदर्भातील सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.

तसेच जळगाव जिल्ह्यातील उर्वरित राहिलेल्या ५ हजार २२० गावांचा देखील या योजनेत समावेश करण्यात आला असल्याचे जाहीर केले.सदर योजनेबाबत जागतिक बँकेच्या अधिका-यांबरोबर बैठक होऊन चर्चा करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्याना मिळणार असल्याचे सांगितले.आमदार चिमणराव पाटील यांनी विधानसभेत पोकरा योजनेचा प्रश्न उपस्थित करून शेतक-यांना न्याय मिळवून दिल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गात व्यक्त केली जात आहे.मतदार संघासह जिल्ह्यातील उर्वरित राहिलेल्या सर्व लाभार्थ्याना या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी दिली.

टीम झुंजार