जळगाव जिल्हा गारठला, गार वाऱ्याने हुडहुडी वाढली; आपले आरोग्य सांभाळा

Spread the love

जळगाव : – उत्तर प्रदेशात थंडीची लाट आली आहे. त्यासोबतच अतिथंड वारे मंगळवारी (ता. ३) रात्रीपासून तीव्र वेगाने वाहत आहे. याचा परिणाम जळगाव जिल्ह्यातही दिसून आला आहे. १ जानेवारीपर्यंत थंडी हलकशी होती. मात्र, मंगळवारपासून अतिथंड वारे सुरू झाल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. बुधवारी (ता. ४) दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळी सर्वत्र दाट धुकेही होते. सकाळपासूनच सूर्यदर्शन झाले नाही. स्वेटर, मफलर, जॅकेट सर्वच जण वापरताना दिसून आले. थंडीपासून बचावासाठी काही ठिकाणी शेकोट्या पेटविल्या गेल्या. दिवसभर चहाला मोठी मागणी होती.

शहराचे बुधवारी सकाळी तापमान ९.५ अंश सेल्सिअस होते. मंगळवारी रात्रीपासूनच गार वारे वाहत असल्याने थंडी जाणवू लागली होती. मकरसंक्रांतीपर्यंत थंडीचा जोर वाढत जाईल. नंतर मात्र ती कमी कमी होत जाईल, असे हवामान अभ्यासक सांगतात.संधिवाताच्या रुग्णांत वाढडिसेंबर महिन्यात थंडी कमी झाली होती. नव्या वर्षात थंडीचा जोर वाढला आहे. अजून काही दिवस थंडी राहील. दोन दिवसांपासून वातावरणात झालेल्या बदलामुळे अनेकांना सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला आहे. ज्यांना संधिवाताचा त्रास आहे त्यांना तो अधिकच जाणवत आहे. सांधे अखडणे, पायात गोळे येणे, हात लवकर खाली-वर न होणे, अशा व्याधी त्यांना अधिक प्रमाणात जाणवून रोजची कामे करताना त्रास होत आहे.

नोव्हेंबर, डिसेंबरपासूनच काही नागरिक सकाळी फिरायला जाणे, व्यायाम करणे, योगा, धावणे, अशा प्रकारची व्यायाम करून शरीराला ऊब मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेकांनी मेथी, डिंक, खारीक-खोबऱ्याचा लाडूचा रोजच्या आहारात सामावेश केल्याने त्यांची इम्युनिटी पॉवर वाढली आहे.लाइट लावून वाहनांचा प्रवाससकाळपासून सर्वत्र धुके असल्याने महामार्गावरून मोठ्या वाहनांना जाताना समोरचे वाहन लवकर दिसत नव्हते. यामुळे मोठ्या, लहान वाहनांना वाहनाचा लाइट लावून वाहन पुढे न्यावे लागत होते.

”थंडीत व्यायाम करणे आरोग्याला लाभदायक असते. थंडीपासून बचावासाठी गरम कपडे वापरावेत. गरम अन्न सेवन करावे. ज्येष्ठ नागरिक व बालकांची अधिक काळजी घेतली पाहिजे. व्यायाम, योगा, प्राणायाम, गरम अन्न सेवन केल्यास थंडीपासून बचाव होईल.”

-डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक

हे वाचलंत का ?

टीम झुंजार