मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : गुवाहाटी येथील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६७ धावांनी मात करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी धडाकेबाज सुरवात करताना पहिल्या चार षटकांत ३५ धावा झोडपल्या. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने शुभमन गिलला (७०) २०व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर बाद केले. त्यानंतर २४व्या षटकात आक्रमक खेळी करणार्या रोहित शर्माला (८३) पहिल्याच चेंडूवर दिलशान मधुशंकाने त्रिफाळाचीत केले. धनंजया डिसिल्वाने श्रेयस अय्यरला (२८) धावांवर बाद केले. के. एल. आणि विराट कोहली यांनी ४थ्या विकेटसाठी ९० दमदार भागीदारी केली. ४१व्या षटकात कसुन रजिथाने राहुलचा (३९) अडसर दूर केला.
कोहलीने बांगलादेश दौर्यावरील तिसर्या सामन्याची पुनरावृत्ती करताना सलग दुसरे शतक झळकावले. हार्दिक पंड्या (१४) आणि अक्षर पटेल (९) हे झटपट बाद झाले. कोहली (११३) शानदार खेळी करून रजिथाच्या ४९व्या षटकातील दुसऱ्या चेंडुवर झेलबाद झाला. मोहम्मद शमी (४) आणि मोहम्मद सिराज (७) हे नाबाद राहिले. भारताने ५० षटकांत ७ बाद ३७३ धावा केल्या. कसुन रजिथाने दोन विकेट्स मिळविले. धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेला निर्धारित ५० षटकांत ८ बाद ३०६ मजल मारता आली. श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका (८८ नाबाद १०८) झुंज व्यर्थ ठरली. पथुम निसंका (७२) आणि धनंजया डिसिल्वा (४७) यांनीही कडवा प्रतिकार केला. अन्य फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावण्यात अपयश आले. उमरान मलिक (३), महंमद सिराजने (२), महंमद शमी(१), हार्दिक पंड्या (१) आणि युझवेंद्र चहलने (१) गडी बाद केले.
शुभमन गिलने पहिल्या १६ एकदिवसीय सामन्याच्या डावांमध्ये सर्वाधिक ७५७ धावा करण्याचा भारतीय विक्रम आपल्या नावावर केला. २०१९ मध्ये भारताच्या एकदिवसीय संघात पदार्पण करणार्या गिलने श्रीलंके विरुद्ध खेळताना पहिल्या सामन्यात हा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने श्रेयस अय्यर (७४८), नवज्योतसिंग सिद्धू (७२५) आणि विराट कोहली (६५५) यांना मागे टाकले. विराटने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतले ४५वे शतक पूर्ण केले. हे त्याचेआंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ७३ वे शतक ठरले. टी२० संघामधून त्याला वगळण्यात आले. त्यामुळे खडबडून जागा झालेल्या विराटकडून हे शतक झळकले. आपलं संघातलं स्थान डळमळीत झालं आहे हे त्याला पुरतं समजून चुकलं आहे. त्याला ह्या शतकासाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. दुसरा एकदिवसीय सामना कलकत्याच्या ईडन गार्डन्स येथे होणार आहे. त्यात श्रीलंका पलटवार करणार की भारत विजयी आघाडी घेणार हे बघणे रोमांचक ठरणार आहे.
हे पण वाचा
- जळगावात ८ वर्षीय चिमुकलीला गळफास देऊन आईनेही संपविली जीवनयात्रा,पतीने फोडला हंबरडा.
- आजचे राशी भविष्य मंगळवार दि.२६ नोहेंबर २०२४
- महाराष्ट्र सरकारने आयपीएस रश्मी शुक्ला यांची पुनर्नियुक्ती केली, महाराष्ट्राच्या डीजीपी पदाचा पदभार स्वीकारणार
- बायकोने नवऱ्याला धोबीपछाड देत मिळवला विजय; हर्षवर्धन जाधव यांच्या पराभव तर रावसाहेब दानवेची लेक जिंकली.
- कर्ज झाले म्हणून ३५ कोटीच्या विमा काढला, मजुराच्या केला खून,अन् स्वत:च्या अपघाती मृत्यूचा केला बनाव; सिनेमा सारखी कहाणी वाचा.