हॉकी विश्वचषक २०२३ : भारताने स्पेनवर २-० मात करत दिली विजयी सलामी

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारतात आयोजित हॉकी विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी भारताने स्पेनवर २-० ने मात करून विजयी सलामी दिली. सलामीचा सामना जिंकत भारतीय संघाने स्पर्धेची आश्वासक सुरुवात केली. भारताने विजयाने स्पर्धेची सुरुवात केल्याने भारतीय संघाचे कौतुक होत असून, मोठ्या अपेक्षाही निर्माण झाल्या आहेत.

भारतासाठी उपकर्णधार आणि सामनावीर ठरलेला अमित रोहिदास आणि हार्दिक सिंग यांनी गोल लगावले. सामन्यात सुरुवातीपासून भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजविले. जोरदार आक्रमणावर भर देत स्पेनच्या गोलपोस्टला सातत्याने लक्ष्य केले.बाराव्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करत अमित रोहिदास याने तेराव्या मिनिटाला भारतासाठी पहिला गोल डागला. भारताने १-० अशी आघाडी घेतल्यानंतर भारतीय खेळाडू आणखी जोशात आले.

त्यांनी दमदार खेळ केला. स्पेनची आक्रमणे यशस्वीरीत्या परतविली. भारताचा खेळ उंचावत असतानाच २७व्या मिनिटाला हार्दिक सिंगने शानदार गोल करून आघाडी वाढविली. हाफ टाइमपर्यंत भारताने २-० अशी दमदार आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या हाल्फमध्ये दोन्ही संघांनी जोरदार लढत दिली; पण कोणत्याही संघाला एकही गोल करता आला नाही. भारताला आघाडी टिकवून ठेवण्यात यश मिळाले आणि भारताने २-० ने सामना जिंकला.

हे पण वाचा

टीम झुंजार