VIDEO : ज्या ताटात खाल्ले त्या ताटात…, मात्र योग्य वेळी आपण उत्तर देणार; गुलाबरावांचा इशारा कोणाला ?

Spread the love

जळगाव : – सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि गटावर टीकास्त्र सोडले आहे. आपल्या होत असलेल्या टीकेचा उल्लेख करत त्यांनी याला योग्यवेळी उत्तर दिले जाईल असे म्हटले आहे. जे काही घडले त्याची सगळी कल्पना आपण उद्धव ठाकरे यांना दिली होती, मात्र त्यांनी योग्य निर्णय घेतला नसल्याचेही पाटील म्हणाले.

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर ताशेरे ओढले आहेत. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांचे नाव न घेता निशाणा साधला आहे. ज्या ताटात खाल्ले त्या ताटात वाईट करायची आपली संस्कृती नाही, मात्र योग्य वेळी आपण उत्तर देणार, असा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे गटाला लगावला आहे.

पहा व्हिडिओ :

जळगाव शहरातील मानराज पार्क परिसरातील मैदानावर गुजर समाज क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने बक्षीस समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील हे मनोगत व्यक्त करत असतांना बोलत होते. पुढे बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, राजकारणात शिवसेना फुटून शिंदे गट वेगळा झाला. त्यावेळी ३२ जण आधीच निघून गेल होते. आपण चाळीसपैकी तेहतीसावे शिंदे गटात सहभागी झालो होतो.
जाताना आपण त्यांना सांगून आलो होतो, आपण भगोडे नाही, असेही देखील मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले.

‘कधी कधी ग खूप नडतो, आणि त्याचाच हा परिणाम आहे’

राजकारणात जे घडत होते त्याची पक्ष नेतृत्वाला आपण सूचना केली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. जर ती घेतली असती तर आज ही वेळ आली नसती. ज्या प्रमाणे अजित पवार यांनी सकाळी सकाळी शपथ घेतली असली तरी त्यांची चूक त्यांनी दुरुस्त केली होती. दिल्लीत केजरीवाल यांचे आमदार फुटून गेले होते त्यांनी लगेच आपली चूक सुधारून पुन्हा त्यांना आपल्या बाजूला करण्यात यश मिळविले होते. या ठिकाणीही हे शक्य होते. मात्र या ठिकाणी ऐकण्याची मानसिकता नव्हती, कधी कधी ग खूप नडतो, आणि त्याचाच हा परिणाम आहे, असे गुलाबराव पाटील म्हणाले.

राजकारणात काम करताना तुम्ही कितीही चांगले काम केले तरी तुम्हाला विरोध करणारे विरोधक हे नेहमी असतातच. अगदी शरद पवार यांच्या सारखा लोकप्रिय नेता असू द्या किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखा नेता असू द्या, त्यांच्या विरोधातसुद्धा लोक पाहायला मिळतात. त्यामुळे त्याचा जास्त विचार न करता आपण आपले काम करत राहायला पाहिजे, असेही मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढे म्हटले आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार