मुबई (गुरुदत्त वाकदेकर) : मायकेल ब्रेसवेलने हैदराबादमध्ये १४० धावा करून न्यूझीलंडला मालिकेच्या सुरुवातीच्या सामन्यात १३१/६ अशा बिकट परिस्थितीतून अशक्यप्राय वाटणार्या विजयाच्या समीप पोहचवले. ब्रेसवेलने मिचेल सँटनर (५७) च्या जोडीने सातव्या विकेटसाठी १०२ चेंडूत १६२ धावांची भागीदारी केली, पण अंतिम षटकात न्यूझीलंडचा डाव ३३७ धावांवर आटोपला आणि भारत १२ धावांनी विजयी झाला. याआधी इशान किशनचा सर्वात कमी वयाचा एकदिवसीय द्विशतक झळकावण्याचा विक्रम एका महिन्यापेक्षा थोडा जास्त काळ होता कारण त्याचा भारतीय सहकारी शुभमन गिल याने आज हैदराबाद येथे न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो मोडला. २३ व्या वर्षी, गिलने त्याचे पहिले एकदिवसीय द्विशतक झळकावले आणि हा टप्पा गाठणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. १४९ चेंडूत त्याच्या शानदार २०८ धावांनी भारताने मालिकेच्या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ५० षटकांत ३४९/८ अशी मजल मारली.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने फलंदाजी करण्याचा पर्याय निवडला आणि पुन्हा एकदा त्याच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याचे आव्हान दिले आणि त्याच्या गोलंदाजांना प्रकाशाखाली बचाव करण्याचे आव्हान दिले (दव घटक लक्षात घेऊन). भारताने गेल्या आठवड्यात श्रीलंकेला क्लीन स्वीप केले असले तरीही रोहित कोणत्याच भ्रमात नव्हता. न्यूझीलंडकडूनही भूतकाळात उपखंडात चांगली कामगिरी झालेली आहे. आणि ते ही जगातील अव्वल असलेला एकदिवसीय संघ का आहे याचे कारण त्यांनी आज दाखवून दिले. ३५० धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. २८ धावांवर न्यूझीलंडची पहिली विकेट पडली. डेव्हन कॉनवे १६ चेंडूत १० धावा करून बाद झाला. त्यानंतर ठराविक अंतराने त्यांचे विकेट पडले. न्यूझीलंडचा सहावा विकेट २९व्या षटकात पडला. कर्णधार टॉम लॅथम ४६ चेंडूत २४ धावा करून बाद झाला. त्याला मोहम्मद सिराजने तंबूत पाठवले. लॅथमने तीन चौकार मारले. यानंतर सॅंटनर आणि ब्रेसवेल यांनी डावाची सुत्रे हाती घेतली. दोघांनी शतकी भागिदारी रचली.
न्यूझीलंडला शेवटच्या षटकात विजयासाठी २० धावांची आवश्यकता होती. शेवटचे षटक शार्दुल ठाकूरने टाकले. या षटकातील पहिल्याच चेंडूवर ब्रेसवेलने षटकार ठोकला. त्यानंतर दुसरा चेंडू ठाकूरने वाईड टाकला. तर तिसऱ्या चेंडूवर ब्रेसवेल पायचीत झाला. अशाप्रकारे भारताने थरारकरित्या न्यूझीलंडवर विजय मिळवला. न्यूझीलंडचा संघ ४९.२ षटकांत ३३७ धावांवर सर्वबाद झाला. ब्रेसवेलने ७८ चेंडूत १४० धावा चोपल्या. त्याने आपल्या खेळीत १२ चौकार आणि १० षटकार ठोकले.तत्पूर्वी, गिलने सुरुवात सावधपणे केली आणि रोहित शर्मासोबत पहिल्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली, ज्यामध्ये रोहितच्या ३४ धावा होत्या. यानंतर भारताने रोहितसह विराट कोहली आणि इशान किशनच्या विकेट्स लवकर गमावल्या होत्या, पण गिलने एक बाजू लावून धरली. गिलने पहिल्या ५२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर आपल्या फलंदाजीचा वेग वाढवला. गिलला ५० ते १०० धावा पूर्ण करण्यासाठी केवळ ३५ चेंडू लागले. तेच शतक ते दीडशे धावांपर्यंत पोहोचायला त्याने तेवढेच चेंडू घेतले. त्यानंतर तो अवघ्या २३ चेंडूत १५० ते २०० धावांपर्यंत पोहोचला. गिलने डावाच्या ४९व्या षटकात लॉकी फर्ग्युसनच्या पहिल्या ३ चेंडूंवर षटकार मारून द्विशतक पूर्ण केले.
गिलच्या द्विशतकानंतर समाज माध्यमावर अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया दिल्याआहेत. युवराज सिंग, आर. अश्विन आणि वीरेंद्र सेहवागसारख्या भारतीय खेळाडूंनी या युवा फलंदाजाचे कौतुक केले आहे.भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तो भारतीय भूमीवर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या हैदराबाद वनडेत रोहितने ही कामगिरी केली.गिलचे वनडे कारकिर्दीतील हे सलग दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने श्रीलंकेविरुद्धही शतक झळकावले होते. गिलने अवघ्या १९ डावात वनडेतील तिसरे शतक झळकावले आहे. भारताकडून फक्त शिखर धवनला कमी डावात ३ शतके झळकावता आली आहेत. धवनने १७ डावात तिसरे शतक झळकावले होते. महंमद सिराजने ४/४६, कुलदीप यादवने २/४३, शार्दुल ठाकूरने २/५३ तर महंमद सामी आणि हार्दिक पंड्याने एक गडी बाद केले. गिलला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुसरा सामना २१ तारीखला रायपूर येथे खेळवला जाणार आहे.