अंगारक ट्रान्सफार्मर कंपनीत आठ लाख रुपायांच्या साहित्याची चोरी.पोलिसांसमोर आव्हान

Spread the love

एरंडोल- येथील म्हसावद रस्त्यावर असलेल्या अंगारक ट्रान्सफार्मर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत चार अज्ञात चोरट्यांनी सुरक्षारक्षकाला जीवे मारण्याची धमकी देवून कंपनीतील कॉपर कॉईल,कॉपर बॉबीन,मोबाईल अशा सुमारे ७ लाख ९३ हजार ५०० रुपये किमतीच्या साहित्याची चोरी केली.म्हसावद रस्त्यावरील रहदारीच्या ठिकाणी कंपनीत घुसून चोरी झाल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलिसांसमोर चोरट्यांना पकडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

याबाबत माहिती अशी,कि म्हसावद रस्त्यावरील पद्मालय फाट्याजवळ असलेल्या उमरदे शिवारात अंगारक ट्रान्सफार्मर प्रायव्हेट कंपनी असून कंपनीमध्ये ट्रान्सफार्मर दुरुस्तीचे काम करण्यात येते.बुधवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास चेहरा बांधलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी कंपनीत प्रवेश करून कंपनीचे सुरक्षारक्षक नामदेव सुकदेव चौधरी यांना धमकावून त्यांना कार्यालयात डांबले.चारपैकी दोन चोरटे सुरक्षारक्षक नामदेव चौधरी यांच्याजवळ थांबले व त्यांच्याजवळ असलेला मोबाईल हिसकावून घेतला.आरोळ्या मारल्यास जीवे ठार मारू अशी धमकी सुरक्षारक्षकास दिली.

त्यानंतर कंपनीत दुरुस्तीसाठी आलेल्या ट्रान्सफार्मरमधील कॉपर कॉईल तोडून कार्यालयातील संगणकाच्या वायरी देखील तोडून टाकल्या.त्यानंतर तीन लाख सोळा हजार सहाशे रुपये किमतीच्या ९०४ किलो वजनाच्या २ एलव्ही.कॉपर कॉईल ५००० केव्हीए क्षमतेच्या ट्रान्सफार्मरला लावलेल्या जुन्या वायर,२ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या ६८० किलो वजनाच्या १ एचव्ही कॉपर बॉबीन,१ लाख ६० हजार रुपये किमतीच्या चारशे किलो वजनाच्या वीस कॉपर बॉबीन आणि पाचशे रुपयाचा मोबाईल असा सुमारे ७ लाख ९३ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची चोरी केली.चोरी केल्यानंतर सुरक्षारक्षकास धमकी देवून चारही चोरटे पसार झाले.

कंपनीचे सुरक्षारक्षक नामदेव चौधरी यांनी कैलास महाजन यांच्या मोबाईलवरून कंपनीत चोरी झाल्याचे व्यवस्थापक विश्राम देशमुख याना कळवले.व्यवस्थापक विश्राम देशमुख यांनी घटनेची माहिती कंपनीचे संचालक संजय काबरा यांना दिली.संचालक संजय काबरा, व्यवस्थापक विश्राम देशमुख यांनी कंपनीत येवून घटनेबाबत माहिती जाणून घेतली आणि पोलिसांना चोरीबाबत माहिती दिली.पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे,उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली.याबाबत कंपनीचे व्यवस्थापक विश्राम देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान कंपनीत धाडसी चोरी झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

हे पण वाचा

टीम झुंजार