बिडकीन (औरंगाबाद) : – सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच पैठण तालुक्यातील पाडळी येथील एका ४० वर्षीय व्यक्तीचा गुरूवारी खून झाला असून शुक्रवारी त्याचे शरीर पोलिसांना गाव शिवारातील एका शेतात सापडले; परंतु शिर सापडले नसल्याचे दिवसभर पोलिसांनी याचा शोध घेतला. मात्र त्यांच्या हाती निराशाच आली.
पाडळी येथील संदीप संपत गायकवाड हा व्यक्ती गुरूवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरातून बाहेर निघून गेला होता. शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याचे शिर नसलेले शरीर गाव शिवारातील एका गायरान शेतामध्ये काही शेतकऱ्यांना आढळले. याबाबत बिडकीन पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सपोनि संतोष माने, उपनि जगदीश मोरे, महेश घुगे, बीट जमादार संजीवन कदम, शरद पवार, सचिन म्हस्के आदी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ठसे तज्ज्ञ, श्वान पथकास पाचारण करण्यात आले. काही वेळानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहुल, स्थागुशाचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, उपनिरीक्षक रामा जाधव, वाल्मीक निकम, खांदेभराड आदी दाखल झाले.
शुक्रवारी दिवसभर पोलिसांनी मयताचे शिर शोधले; परंतु ते सापडले नाही. यावेळी पोलीस मयताचे शरीर ग्रामीण रूग्णालयात आणत असताना त्यास मयताच्या नातेवाईकांनी विरोध केला. आगोदर आरोपींना अटक करा, मगच मृतदेह उचला असा आक्रमक पवित्रा घेतला. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मृतदेह बिडकीन ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. रात्री उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.
मयतावर विविध गुन्हे :
मयत संदीप गायकवाड हा परिवारासह पाडळी येथे राहत होता. त्याला १६ वर्षाचा एक मुलगा व एक लहान मुलगा आहे. मात्र सद्यस्थितीत तो पत्नीसोबत राहत नसल्याचे समजते. त्याच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्यात मारहाण, विनयभंग असे गुन्हे दाखल असून पूर्व वैमान्यासातून ही घटना घडली असावी, असा आरोप नातेवाईक करीत आहेत. पाडळी येथे दंगा नियंत्रण पथकास पाचारण करण्यात आले आहे.
एका संशयितास घेतले ताब्यात :
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी एका संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे समजते. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






