भारताचा न्यूझीलंडवर ३-० असा दमदार मालिका विजय, एकदिवसीय क्रमवारीत पोहचला अव्वल स्थानी.

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा समान आज इंदूरमध्ये खेळवला गेला. हा सामना ९० धावांनी खिशात घालताना भारताने ३-० या फरकाने ही मालिका जिंकली आणि सोबतच एकदिवसीय क्रिकेटमधील क्रमवारीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे. इंदूरमध्ये नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताने संधीचा फायदा घेत दमदार सलामी दिली. ४५ चेंडूंत भारताने ५० धावा केल्या. त्यात रोहित (२१) आणि शुभमन (२७) धावा काढल्या. १०व्या षटका अखेर भारताने ८२ धावा झळकावल्या. १२.४ षटकांत भारताच्या १०० धावा झळकल्या. गिलने ३३ चेंडूंत तर रोहितने ४१ चेंडूंत अर्धशतक झळकावलं. १७.५ षटकांत भारताच्या १५० धावा जमा झाल्या. त्यात रोहित (७८) तर गिल (६८) धावांवर नाबाद खेळत होते. केवळ २४.१ षटकांत अर्थात १४५ चेंडूंत त्यांनी २०० धावांची भागीदारी रचली. त्यात रोहित (९५) तर गिल (९७) धावांवर नाबाद खेळत होते. रोहितने ८३ चेंडूंत तर गिलने ७२ चेंडूंत शतक झळकावले. २७व्या षटकाच्या ब्रेसवेलच्या पहिल्याच चेंडूवर रोहित त्रिफळाचीत झाला. त्याने ९ चौकार आणि ६ षटकारांच्या सहाय्याने ८५ चेंडूंत १०१ धावा काढल्या. भारताने २१२ धावांची दमदार सलामी दिली होती.

टिकनरने टाकलेल्या २८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गिल बाद झाला. त्याने १३ चौकार आणि ५ षटकारांच्या सहाय्याने ७८ चेंडूंत ११२ धावा काढल्या. भारताच्या खात्यावर २३०/२ जमा झाल्या होत्या. विराट कोहली आणि इशान किशनला मोठी खेळी साकारण्यासाठी मोठी संधी होती, पण इशान १७ धावांवर धावचीत झाला. तर विराट ३६ धावा काढून तंबूत परतला. सूर्यकुमारही केवळ १४ धावांवर परतला. ३८.४ षटकांत भारताचा निम्मा संघ २९३ धावांवर परतला होता. हार्दिक पंड्याने सामन्याची सूत्र आपल्या हाती घेतली. पण वॉशिंग्टन सुंदर (९) धावांवर बाद झाला. ७व्या विकेटसाठी हार्दिक आणि शार्दुल ठाकूरने केवळ ३३ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. त्या हार्दिक (२८) तर ठाकूरच्या (२५) धावा होत्या. ४८व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ठाकूर बाद झाला. ४९व्या षटकाच्या ४थ्या चेंडूवर पंड्या बाद झाला. त्याने ३ चौकार आणि ३ षटकारांच्या सहाय्याने ३८ चेंडूंत ५४ धावा काढल्या. कुलदीप यादव (३) डावाच्या शेवटच्या चेंडूवर धावचीत झाला. रोहित आणि गिल खेळत असताना भारत ५०० पार धावसंख्या पोहचवेल असं वाटत असताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी डावाच्या उत्तरार्धात चांगली गोलंदाजी करत ३८५/९ वर भारताला रोखले.

न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. पंड्याने दुसर्‍याच चेंडूवर फिन अॅलनचा (०) धावांवर त्रिफळाचीत केले. डेवन कॉन्वे आणि हेनरी निकल्स यांनी डाव सावरला. ७.१ षटकांत त्यांनी संघाचं अर्धशतक झळकावलं. डेवन कॉन्वेने ४१ चेंडूंत आपलं अर्धशतक झळकावलं. दोघेही चांगले खेळत असताना कुलदीप यादवने हेनरी निकल्सला (४२) धावांवर पायचीत टिपले. डैरिल मिचेलच्या सोबतीने कॉन्वेने ७८ धावांची भर घातली. मिचेलला शार्दुलने २४ धावांवर बाद केले. कर्णधार यष्टिरक्षक टॉम लेथम (०) आणि ग्लेन फ़िलिप्स (५) झटपट बाद झाले. २७.४ षटकांत २०० धावांवर न्यूझीलंडचा निम्मा संघ परतला होता. त्यांना २२.२ षटकांत विजयासाठी १८६ धावांची गरज होती. पण ३२व्या षटकाच्या ४थ्या चेंडूवर कॉन्वे १३८ धावांवर बाद झाला आणि भारताच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. माइकल ब्रेसवेल (२६) आणि लॉकी फ़र्ग्युसन (७) धावांवर कुलदीपने बाद केले. तर चहलने जेकब डफ़ी (०) पायचीत आणि मिचेल सैंटनरला (३४) धावांवर विराटच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. न्यूझीलंडचा डाव ४१.२ षटकांत केवळ २९५ धावांवर संपला होता.

एकाच सामन्यात तीन सलामीवीरांनी शतके झळकावण्याची ही केवळ पाचवी घटना होती. ह्या प्रत्येक फलंदाजाला शतकाचे दुहेरी शतकात रूपांतर करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होता. रोहितचे तीन वर्षांतील पहिले शतक होते, तर गिलचे चार डावांतील तिसरे शतक होते. रोहितने सनथ जयसूर्याच्या २७० षटकारांना मागे टाकून सर्वकालीन यादीत तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला. गिलने (३६०) एकदिवसीय मालिकेत तीन किंवा त्यापेक्षा कमी सामने खेळताना सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. रोहित किंवा गिल एवजी सामनाधिकार्‍यांनी शार्दुल ठाकूरला सामनावीर घोषित केले. त्याने फलंदाजी करताना केवळ १७ चेंडूंत २५ धावा काढल्या तर निर्णायक गोलंदाजी करताना ६ षटकांत ४५ धावांत ३ महत्त्वपूर्ण गडी बाद केले. शुभमन गिलला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

टी२० मालिकेतला पहिला सामना २७ जानेवारी रोजी रांची येथे होणार आहे.

टीम झुंजार