मुंबई – सध्या स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कोणतीही परीक्षा जाहीर झाली की लाखोंच्या संख्येत अर्ज येतात. भरती प्रक्रियेच्या अगदी कमी जागा असतील तरी मोठी चुरस बघायला मिळते.
अशातच, राज्यातील अनेक तरुण- तरुणी पोलीस भरतीसाठी तयारी करत असल्याचं चित्र आहे. त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण, आता राज्यात लवकरच 7 हजार 200 पोलीस पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे.
नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या राज्यातील 5 हजार 200 पदासाठी भरती प्रक्रिया सुरु असून ती अंतिम टप्प्यात आहे. ही भरती पूर्ण झाली की, लगेच 7 हजार 200 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
पोलीस भरतीच्या संदर्भामध्ये ५ हजार २०० पोलिसांची भरती करण्याचं काम पूर्वत्वाच्या दिशेने आहे, लेखी आणि शारिरीक परीक्षा झाल्या असून त्याची अंतिम यादी जाहीर करणं बाकी आहे. त्यानंतर आता ७ हजार २०० पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. भरती प्रक्रियेत नवीन नियमानुसार शारीरिक चाचणीच्या अगोदर लेखी परीक्षा घेतली जाईल.