आपत्कालीनसाठी बोट व लेखी आश्वासनाने सात्री ग्रामस्थांच्या जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगित

Spread the love

जलसमाधी आंदोलकांना मारवड पोलिसांनी गोवर्धन येथे केला मज्जाव.

जागीच आंदोलकांचा ठिय्या व रास्तारोको , प्रशासनाविरुद्ध घोषणाबाजी.

गौरवकुमार पाटील / अमळनेर

स्वतंत्रपूर्व काळापासून रास्तच नसल्याने पर्यायी रस्ता ,गृहसंपादन ,पुनर्वसन आदी मागण्यांसाठी पाडळसरे येथून जवळच असलेल्या सात्री ग्रामस्थांनी पुकारलेल्या जलसमाधी आंदोलनाला पूर्व तयारीनिशी निघालेल्या आंदोलकांना मारवड पोलिसांनी गोवर्धन येथे अटकाव करून पुढे जाण्यास मज्जाव केल्याने संतप्त आंदोलकांनी जागीच ठिय्या व रास्तारोको आंदोलन करत ,प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाविरुद्ध घोषणाबाजी देत निषेध व्यक्त केला , शेवटी कार्यकारी अभियंता व महसूल विभागाने दिलेल्या लेखी आश्वासनानंतर जलसमाधी आंदोलन तात्पुरते स्थगिती देण्यात आली आहे. मात्र मागण्यांबाबत तात्काळ पाऊले न उचलल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा ही देण्यात आला.

वेळोवेळी निवेदन देवून ही समस्या सुटत नसल्याने तसेच वेळोवेळी आश्वासनांवर बोळवण केली जात असल्याने सात्री ग्रामस्थ व्यथित झाले होते व प्रजासत्ताकदिनी पाडळसरे धरणाच्या जलसाठ्यात ग्रामस्थांसह जलसमाधी घेण्याचा इशारा निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांना दिला होता. काल प्रजासत्ताक दिनी २६ रोजी सकाळी १०:३० वाजता ग्रामस्थ पाडळसरे जात असताना पोलिसांनी त्यांना गोवर्धन येथे अडविले असता त्याठिकाणी ग्रामस्थांनी रस्ता रोको व ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी निम्न तापी प्रकल्पाचे कार्य. अभियंता मुकुंदा चौधरी, उपकार्य. अभियंता व्ही एस पाटील यांसह अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत समजूत काढली. तसेच प्रांत अधिकारी व तहसीलदार यांच्या वतीने मंडळ अधिकारी एन. आय. कटारे, तलाठी वाल्मिक पाटील यांनी लेखी आश्वासन दिले. सदर आश्वासनात नमूद केले आहे की, गावास बारमाही रस्ता पाटचारी मार्गाने रस्त्याची मागणी केली आहे. परंतु काही ग्रामस्थांनी सदर पाटचारी मार्गाने होणा-या रस्त्यास विरोध दर्शविला आहे.

त्या अनुषंगाने ग्रामसभेत चर्चा व एकमताने ठराव करून पर्यायी रस्त्याचे मार्ग निश्चिती करावी, व कळवावे. गृह संपादन प्रस्ताव गावठाण कामाच्या अधिसुचनेस जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे. दोन्ही मयतांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी शासनास प्रस्ताव सादर केला ,पुर्नवसन गावठाण मधील भूखंड वाटप बाबत जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसन सचिव यांना पत्र लिहिले आहे ,मागण्यांची पुर्तता करणे तसेच गावातील समस्यांचे निराकरण करण्याबाबत सर्व कार्यवाही शिघ्रगतीने सुरू असल्याने आपण कोणत्याही प्रकारची जल समाधी करू नये अशी विनंती या लेखी आश्वासनांत करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदार यांनी नगरपालिका प्रशासनाला पत्र देत पालिकेत असलेली बोट व आपत्कालीन परिस्थितीत उपयोगी असलेले साहित्य सात्री ग्रापंच्या ताब्यात द्यावे असे नमूद केले आहे.

यावेळी ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांची विनंती मान्य करत आंदोलन मागे घेतले मात्र पुन्हा आश्वासन देवून कार्यवाही न झाल्यास होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील असा इशारा ही दिला. यावेळी माजी सरपंच महेंद्र बोरसे, रवींद्र बोरसे, सचिन बोरसे, मनोहर बोरसे, भीला पाटील, सुमनबाई भील, सुनील बोरसे, भटा बाई भील, सुनंदा भील, सखुबाई भील, बेबाबाई भील, निर्मलाबाई पाटील, चंद्रकलाबाई पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मारवड पोलीस ठाण्याचे एपीआय जयेश खलाणे, पीएसआय बाळकृष्ण शिंदे, हवालदार भरत ईशी,फिरोज बागवान ,सुनील तेली , रेखा परदेशी, सुनील अगोणे यासह मारवड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

१)प्रतिक्रिया —
दोन वर्षेझाली विविध प्रकारे आंदोलन करुनही शासन दरबारी हेलपाटे सुरू आहेत , वारंवार फक्त तोंडाला पाने पुसली जातात म्हणून पाडळसरे धरणस्थळी जलसमाधी आंदोलन करण्यात येणार होते ,त्यात पोलिसांनी अडवून ,पोलीस ,महसूल ,पाटबंधारे विभागाने आंदोलनाची दखल घेवून समस्या दूर करण्यासाठी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले , मात्र प्रलंबित प्रश्न न सुटल्यास १ मे नंतर कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा जलसमाधी आंदोलन करण्यात येईल तसेच पावसाळ्यापर्यंत पर्यायी रस्त्याचा प्रश्न न सुटल्यास ग्रामस्थ अधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानात राहायला येतील. त्यानंतर होणाऱ्या परिणामास शासन जबाबदार राहील.

महेंद्र बोरसे.- माजी सरपंच, सात्री
सदस्य, जिल्हा पुनर्वसन समिती जळगाव

२)प्रतिक्रिया —
सात्री ग्रामस्थांनी मागणी केलेल्या रस्त्याबाबत गावातील निवडक लोकांनी विरोध दर्शविला , म्हणून परत ग्रामसभेत ठराव मंजूर करून नव्याने प्रस्ताव सादर केल्यास प्रशासन कडक धोरण अवलंबून तापी महामंडळ खर्च करून रस्ता करेल ,गृहसंपादन व भूखंड वाटप बाबत विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी यांनी पुनर्वसन सचिव यांना पत्र दिले आहे ,तर तहसीलदार यांनी मृतांच्या नातेवाईकांना सहाय्यसाठी प्रस्ताव सादर केला आहे ,म्हणून आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे म्हणून लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित केले

मुकुंदा चौधरी,
कार्यकारी अभियंता ,पाडळसरे धरण

टीम झुंजार