साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करून, लग्नाच्या चौथ्या दिवशीच ब्युटी पार्लर मधून नववधू पसार

Spread the love

यावल : नासिक येथील एका युवतीने येथील वाणी गल्लीतील युवकाशी लग्न करत चौथ्या दिवशीच पोबारा केला आहे. लग्न लावण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी घेतलेले दोन लाख रुपये रोकडसह, नववधूने घरातील कपाटात ठेवलेली पन्नास हजार रुपयांची रोकड व १५ ग्रॅम सोन्याचे दागिने अशी सुमारे साडेतीन लाख रुपयांची फसवणूक करत नववधू पसार झाली आहे.याप्रकरणी नववधूसह पाच जणांवर युवकाच्या फिर्यादीवरून येथील पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  येथील वाणी गल्लीतील रहिवासी चित्तरंजन जयप्रकाश गर्गे या युवकाचे बऱ्हाणपूर येथील नातेवाईक अशोक सुधाकर जरीवाले यांनी शिर्डी येथील शिला साईनाथ अनर्थे (पाटील) या महिलेस चित्तरंजन गर्गे यांच्यासाठी मुलगी पाहण्यासाठी सांगितले असता शिला अनर्थे यांनी नाशिक येथील माया संजय जोशी या मुलीच्या नाशिक येथील तिच्या घरी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला.

मुलगी पसंत असल्याचे गर्गे यांनी कळविल्यावर १५ जानेवारीला मुलीसह तिचे कुटुंबीय व शिला अनर्थे येथील गर्गे यांचे घरी आले. मुलीकडील मंडळीला मुलाचे घर आवडल्यानंतर त्यांनी मुलीचे लग्न लावून देण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी केली. त्यापैकी त्या दिवशी ५० हजार रुपये आगाऊ रक्कम घेऊन उर्वरित रक्कम लग्नाचे दिवशी देण्याचे ठरले.त्यानंतर नाशिक येथून बऱ्हाणपूर येथे विवाह लावण्यासाठी गर्गे यांनी फोन पेद्वारे वाहनभाडे बारा हजार रुपये पाठवले.३० जानेवारीला बऱ्हाणपूर येथील गायत्री संस्कार ट्रस्ट येथे हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे विवाह लावण्यात आला. लग्न लावून ३० जानेवारीला रात्री नववधूस, यावल येथे आणण्यात आले. दरम्यान, २ फेब्रुवारीस येथील फालकनगरातील ब्युटी पार्लरमधून नववधूने पलायन केले.

गावात सर्वत्र शोध घेतला असता नववधू आढळून आली नाही. गर्गे यांनी तातडीने घरी जात घरचे कपाटातील वस्तूंचा शोध घेतला असता ५० हजार रुपयाची रोकड व १५ ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास झाले असल्याचे लक्षात आले.यावरून गर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात बऱ्हाणपूर येथील संशयित अशोक सुधाकर जरीवाले, शिर्डी येथील संशयित शीला साईनाथ अनर्थे, नाशिक येथील नववधू संशयित माया संजय जोशी, नववधूचा भाऊ संशयित प्रकाश संजय जोशी व प्रकाश जोशी यांची पत्नी अशा पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे तपास करीत आहेत.

ब्युटी पार्लरमध्ये सोडले, अन्…

लग्न लावून ३० जानेवारीला रात्री नववधूस यावल येथे आणण्यात आले. २ फेब्रुवारीस येथील फालकनगरातील ब्युटी पार्लरमध्ये नववधूस पती चित्तरंजन गर्गे यांनी तिला सोडले. पार्लरमध्ये वेळ लागणार असल्याने गर्गे घरी निघून गेले. पुन्हा एक तासाने नववधूस घेण्यासाठी आले असता नववधूने पार्लरमधून पलायन केले. गावात सर्वत्र शोध घेतला असता नववधू आढळून आली नाही.

टीम झुंजार