कोण आहेत ९२ व्या वर्षीही “त्या” मोठ्या कष्टाने करतात शेती.

Spread the love

पुणे : शेती करणे म्हणजे मोठे कष्टाचे काम. युवा पिढीतील अनेकजण शेती करायची म्हटली की, कानाडोळा करताना दिसतात. पण, वाघाळे (ता. शिरुर) येथील श्रीमती जयवंताबाई दत्तू शेळके या वयाच्या ९२ व्या वर्षीही मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने आजही शेती पिकवत आहेत. युवा पिढीपुढे त्यांनी एक आदर्श ठेवला आहे.

शेतीमध्ये घाम गाळला तरच काळीआई भरभरून धान्य देते. पिक येण्यासाठी रात्रं-दिवस घाम गाळावा लागतो. अनेकांना शेतीमधील कष्टाचे काम नको असते. पण, वाघाळे येथील ९२ वर्षाच्या जयवंताबाई या रात्रं-दिवस शेतामध्ये काम करत आहेत. जयवंताबाई यांच्या पतीचे १९७२ च्या दुष्काळात निधन झाले. १९७२ च्या दुष्काळात शिरूर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता. पतीच्या निधनानंतरही जयवंताबाई या खचल्या नाहीत. मुलांसाठी कंबरेला पदर खोचून त्यांनी शेती पिकवण्याचा निर्णय घेतला. शेतीमध्ये कष्ट करून त्यांनी मुलांना मोठे शिक्षण देऊन शहरात पाठवले.

मुले नोकरी व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्य करू लागली. पण, जयवंताबाई यांनी शहरात न जाता गावात राहूनच शेती करण्याचा कायमस्वरूपी निर्णय घेतला. वयाच्या ९२ व्या वर्षीही हातात काठी घेऊन त्या शेतात जातात आणि हातात खुरपे घेऊन खुरपताना दिसतात. पिके काढताना दिसतात. अगदी वर्षेभर रात्रं-दिवस त्या शेतात काम करत असतात. नेहमीप्रमाणे त्यांनी यंदाही मोठ्या मेहनतीने गव्हाचे चांगले पिक घेतले आहे. गव्हाला पाणी देणे, खुरपण्याचे काम त्या करत असतात. जयवंताबाई यांचा शेतीमधील कामाचा उत्साह आजही नेहमीसारखाच आहे.

जयवंताबाई सांगतात, ‘दुष्काळी परिस्थिती असतानाही शेतीने दोन घास खाऊ घातले आहेत. आता तर शेती पाण्याखाली आली आहे. शेतामध्ये काम करताना मोठी उर्जा मिळते. हेच खऱ्या अर्थाने माझ्या आरोग्याचे गमक आहे. शेतीमध्ये काम करून मोठा आनंद मिळत आहे. शरीरात जीव आहे तोपर्यंत गावात राहून काळ्या आईची सेवा करत राहणार आहे.’ ‘जयवंताबाई या गावातील ज्येष्ठ महिला आहेत. त्यांना आम्ही लहानपणापासून शेतामध्ये काम करताना पाहात आलो आहोत. खरोखरंच युवकांना लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे. वयाच्या ९२व्या वर्षीही त्या हातात काठी आणि खुरपे घेऊन काम करताना दिसतात. त्यांनी मेहनत घेऊन शेतातील पिके पाहिल्यानंतर आमच्याही कामाचा उत्साह वाढतो. ९२ वर्षांच्या आजीला मनापासून सलाम,’ अशी प्रतिक्रिया गावचे तरूण देत आहेत. एका मराठी वेबसाईट वरून

टीम झुंजार