मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी महिला टी२० वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारताने बुधवारी बेस्ट इंडिजवर सहा विकेट्स राखून सलग दुसरा विजय मिळविला. विजयासाठीचे ११९ धावांचे लक्ष्य भारताने १८.१ षटकांत चार बाद ११९ धावा करीत साध्य केले. कर्णधार हरमनप्रीत कौर (४२ चेंडूंत ३३) आणि रिचा घोष (३२ चेंडूंत नाबाद ४४) यांनी दमदार भागीदारी रचून भारताचा विजय सुकर केला. भारताला विजयासाठी चार धावांची आवश्यकता असताना हरमनप्रीत बाद झाली. रिचाने मग पुणेकर अष्टपैलू खेळाडू देविका वैद्यच्या (१ चेंडूंत नाबाद ० ) साथीने भारताचा विजय साकार केला. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला दमदार सलामी मिळणार, असे वाटत असतानाच स्मृती मानधनाला (७ चेंडूंत १०) रशादा विल्यम्सने करिश्मा हराकच्या गोलंदाजीवर यष्टीचीत केले.
त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जचा (५ चेंडूंत १) ले मॅथ्यूजने स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपला. सलामीची फलंदाज शफाली वर्मा (२३ चेंडूंत २८) दमदार फलंदाजी करीत असतानाच झेलबाद झाली. धावगती वाढविण्याचा प्रयत्न करताना तिने पाच चौकार लगावले. करिश्माच्या गोलंदाजीवर उडालेला तिचा झेल अफी फ्लेचरने टिपला. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनी आणखी पडझड होऊ न देण्याची खबरदारी घेत विजयाच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली. डावाला आकार देण्याबरोबरच त्यांनी धावगती वाढविण्याचेही कसोशीने प्रयत्न केले. त्याआधी, वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
विंडीजची सुरुवात निराशाजनक झाली. दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कर्णधार हैली मॅथ्यूज (६ चेंडूंत २) ही पूजा वस्त्रकारच्या गोलंदाजीवर बाद झाली. रिचा घोषने तिचा झेल टिपला. त्यानंतर स्टफानिए टेलर आणि शेमेन कॅम्पबेल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली.चौदाव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर शेमेन कॅम्पबेल (३६ चेंडूंत ३०) झेलबाद झाली. दीप्ती शर्माांच्या गोलंदाजीवर उडालेला तिचा झेल स्मृती मानधनाने टिपला. याच षटकातील शेवटच्या चेंडूवर स्टफानिए टेलरला (४० चेंडूंत ४२) दीप्ती शर्माने पायचीत केले. चिनेल्ले हेन्री अवघ्या दोन धावा काढून धावबाद झाल्याने विंडीजची अवस्था १४.२ पटकांत ४ बाद ७९ अशी झाली.
त्यामुळे धावगतीही मंदावली. शविका गजनबी (१३ चेंडूंत १५) धावगती वाढविण्याच्या प्रयत्नात रेणुका सिंगच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. अफी प्लेचरला दीप्ती शर्माने भोपळाही फोडू न देता त्रिफळाचीत केले. चेडीयन नेशनने १८ चेंडूंत नाबाद २१ धावा केल्या. रशादा विल्यम्स दोन धावांवर नाबाद राहिली. विंडीजने निर्धारित २० षटकांत ६ बाद ११८ धावा केल्या.दीप्ती शर्माने १५ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स मिळविल्या. रेणुका सिंग, पूजा वस्त्रकार यांनी प्रत्येकी एक विकेट मिळविली. एक फलंदाज धावबाद झाली. सामन्यातून भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाने पुनरागमन केले; पुणेकर अष्टपैलू देविका वैद्य हिलादेखील संघात संधी मिळाली.
दीप्ती सर्वाधिक विकेट्स घेणारी भारतीय
सामनावीर ठरलेली दीप्ती शर्मा टी२० प्रकारामध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी पहिली भारतीय महिला गोलंदाज ठरली. तिने पूनम यादवचा ९८ विकेट्सचा विक्रम मोडत १०० विकेट्स घेत नवीन विक्रमाची नोंद केली. बुधवारच्या सामन्यात एकाच षटकात दोन विकेट्स घेत तिने नवीन विक्रम केला. दीप्तीने १५ धावांच्या मोबदल्यात तीन विकेट्स मिळविल्या. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदच्या नावावर आहे. तिने १२५ विकेट्स घेतल्या आहेत.भारताचा पुढचा सामना इंग्लंड विरुद्ध १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी आपले दोन्ही सामने जिंकून ४ गुण खात्यावर जमा केले आहेत. पण निव्वळ धावगतीच्या आधारे इंग्लंड ब-गटाच्या प्रथम क्रमांकावर विराजमान आहे.