झोपेच्या नादात गच्चीवरुन खाली पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; जळगावमधील घटना

Spread the love

जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द या ठिकाणच्या एका तरुणाला त्याच्याच चुकीमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये तरुणाचा घराच्या छतावरून खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.बुधवारी सकाळी 7 वाजता हि घटना घडली आहे. अंकुश ज्ञानेश्वर चौधरी (वय-25 वर्ष, रा. खेडी खुर्द ता. जि. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. अंकुशची आजी सकाळी त्याला उठवायला गेली असता हि घटना समोर आली आहे. गच्चीला कठडे नसल्याने झोपेच्या धुंदीत शौचालयाला जात असतांना अंकुश खाली पडला. या घटनेप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
जळगाव तालुक्यातील खेडी खुर्द गावातील अंकुश चौधरी हा आई, वडील, भाऊ यांच्यासोबत राहत होता. अंकुशचे वडील आजारी असतात. त्यामुळे अंकुश हाच शेतीचे सर्व कामे करत होता. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री शेतीची कामे आटोपून अंकुश हा घरी आला आणि जेवण करून घराच्या गच्चीवर झोपण्यासाठी गेला.

यानंतर दुसऱ्या दिवशी अंकुशची आजी त्याला सकाळी 6 वाजता उठवायला गेली असता हि धक्कादायक घटना उघडकीस आली. यावेळी अंकुश गच्चीच्या खाली रक्ताबंबाळ अवस्थेत आढळून आला. यावेळी नातवाचा मृतदेह पाहून आजीने आरडाओरड करत हंबरडा फोडला. ते ऐकून कुटुंबियांनीही गच्चीकडे धाव घेतली आणि अंकुशचा मृतदेह पाहून एकच आक्रोश केला.या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला.

यानंतर पोलीस स्टेशनमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. तसेच जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अंकुशच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत अंकुशच्या माघारी आई सुनिता, भाऊ भावेश, वडील ज्ञानेश्वर विठ्ठल चौधरी, आजी गोपाबाई असा परिवार आहे. हेडकॉन्स्टेबल विश्वनाथ गायकवाड या घटनेचा पुढील तपास करत आहेत. अकुशचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात गावात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.

हे देखील वाचा

टीम झुंजार