मोटरसायकल चोरी प्रकरणात गॅरेज चालकास अटक.तीन मोटर सायकली जप्त,आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी.

Spread the love

एरंडोल :- येथील लक्ष्मीनगर मधील शिक्षकाची मोटर सायकल चोरी प्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे येथील गॅरेज चालकास अटक करून एरंडोल पोलीसांच्या ताब्यात दिले.आरोपीकडून तीन चोरीच्या मोटर सायकली जप्त करण्यात आल्या.दरम्यान आरोपीस न्यायालयासमोर उभे केले असता त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी दिला.सदर चोरी प्रकरणात धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पोलीस कर्मचा-यांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

याबाबत माहिती अशी,कि शहरातील लक्ष्मीनगर येथील रहिवासी संजय रमेश पाटील यांच्या मालकीची मोटर सायकल क्रमांक एम.एच.१९ बी.एक्स.६५९२ रात्री घरासमोर लावली होती.सुमारे दोन वर्षापूर्वी ११ जुलै २०२० रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सदर मोटर सायकल चोरल्याची तक्रार संजय पाटील यांनी पोलीस स्थानकात दिली होती.संजय पाटील यांनी सदरची मोटर सायकल जळगाव येथील अपना कार बाजार येथून खरेदी केली होती.

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरून पथकाने धुळे येथील चाळीसगाव रस्त्यावरील समर्थ कॉलनी परिसरातील गॅरेज चालक जुबेद रशीद पठाण उर्फ बबलू पठाण यास अटक करून एरंडोल पोलिसांच्या ताब्यात दिले.बबलू पठाण याच्या ताब्यातून सुमारे एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या तीन मोटर सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

आरोपीकडून जप्त करण्यात आलेल्या तीनही मोटारसायकली काळ्या रंगाच्या असून होंडा कंपनीच्या सी.बी.युनिकॉर्ण कंपनीच्या आहेत.आरोपी जुबेद पठाण यास न्यायालयासमोर उभे केले असता त्यास दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याच्या आदेश न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी दिला.सदर चोरीमध्ये धुळे येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पोलीस कर्मचा-यांचा सहभाग असल्याची माहिती पोलीस तपासात उघडकीस येण्याची शकयता आहे.आरोपी जुबेद पठाण याच्याकडून अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.पोलीस उपनिरीक्षक शरद बागल तपास करीत आहेत.

हे देखील वाचा

टीम झुंजार