नपा सफाई कामगारांना निवासस्थान, मंगल कार्यालय, सांस्कृतिक भवन, व्यायामशाळा मिळावे
एरंडोल (प्रतिनिधी) – येथील नपा कायम सफाई कामगारांना निवासस्थान, मंगल कार्यालय, सांस्कृतिक भवन, व्यायामशाळा आणि वाचनालय मिळावे या मागणीसाठी येथील अखिल भारतीय श्री वाल्मिक नवयुवक संघ (भारत) तर्फे मुख्याधिकारींना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाने सफाई कामगारांकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत तसेच इतर योजनेअंतर्गत निवासस्थानाची सोय करण्याबाबत वेळोवेळी निर्देश दिले आहेत परंतू नपातर्फे अद्यापपावेतो कोणतीही अंमलबजावणी करण्यात आलेली नाही.
नपाने दि. 17/12/2019 रोजीचा सर्वसाधारण सभा ठराव क्र. 433 मध्ये नपा मालकीच्या गट क्र. 1589, 1590 ही जागा पूर्वी कचरा डेपोकरीता वापरात होती परंतू आता कचरा डेपो शहराच्या बाहेर नवीन जागेवर स्थलांतरीत झाल्याने जून्या जागेत नवीन अद्यावत सफाई कामगारांचे निवासस्थान, मंगल कार्यालय, सांस्कृतिक भवन, केशरीनंदन आखाडा, व्यायामशाळा, वाचनालय विकसित करण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दि. 13/12/2019 रोजी राजूजी पवार अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्य, सफाई कर्मचारी आयोग मुंबई यांनी शासकीय नियोजित दौर्यादरम्यान एरंडोल नपास भेट देवून नपा आस्थापन वरील सफाई कामगारांच्या निवासस्थाना बाबत नाराजी व्यक्त केल्याने सदरचा विषय आगामी सर्वसाधारण सभेत घेण्याचे आश्वासन मुख्याधिकारी, अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी दिले होते परंतू सदरचा विषय सर्वसाधारण सभा ठराव नं. 433 सर्वानुमते मंजूर होवून देखील नपातर्फे कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. सन 1952 मध्ये सफाई कामगारांना आज ज्या ठिकाणी राहात आहेत त्याठिकाण कच्च्या मातीच्या 11 खोल्या देण्यात आल्या होत्या पंरतू आजपावेतो नपाने त्याकडे पूर्णत: दुर्लक्ष केलेले आहे. सदर खोल्या जिर्ण झाल्या असून तेथे राहणार्या कर्मचार्यांना जीव देखील धोक्यात आला आहे. नपाकडे वेळोवेळी तक्रारी करून देखील दुर्लक्ष केले जात आहे.
तरी सदर परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार होवून नपाने दि. 17/12/2019 रोजीचे सर्वसाधारण सभा ठराव क्र. 433 नुसार कार्यवाही करावी तसेच सेवानिवृत्ती सफाई कामगारांनी स्वत: खर्च करून निवासस्थान बांधकाम केलेले असून सदरची जागा त्यांच्या नावे नियमित करून निवासस्थान बांधकामकामी लागलेला खर्च नपाकडून मिळावा अशी मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, नगरविकासमंत्री, केंद्रीय सामाजिक न्याय व राज्यमंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर जिल्हाध्यक्ष सुनिल खोकरे, जिल्हासचिव देवानंद बेहेरे, जिल्हासंपर्कप्रमुख मोहन चव्हाण यांच्या सह्या आहेत.