ताहलिया मॅकग्राची ९० धावांची खेळी आतापर्यंत सर्वोत्तम
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : महिला प्रीमियर लीगमध्ये दिल्ली संघाने सलग दुसर्या सामन्यात धावसंख्या २०० पार पोहचवली. उत्तरप्रदेशच्या संघाला २१२ धावांचं आव्हान पार करता आलं नाही आणि दिल्ली संघाने ४२ धावांनी सामना जिंकला. महिला प्रीमियर लीगच्या पाचव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने ४ गडी गमावून २११ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यूपीचा संघ पाच गडी गमावून केवळ १६९ धावा करू शकला. दोन सामन्यांत दिल्लीचा हा सलग दुसरा विजय आहे. त्याचवेळी, यूपीचा दोन सामन्यांमध्ये पहिला पराभव झाला आहे. या सामन्यात यूपीचा संघ ग्रेस हॅरिसशिवाय मैदानात उतरला आणि २१२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना संघाला तिची उणीव भासली. मॅकग्राने ९० धावांची शानदार खेळी खेळत यूपीसाठी सामना जिंकण्याचा प्रयत्न केला, पण तिला कोणतीच साथ मिळाली नाही आणि तिची खेळी व्यर्थ गेली.
२१२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना यूपीची सुरुवात चांगली झाली. यूपीने दोन षटकात एकही विकेट न गमावता २२ धावा केल्या होत्या, परंतु जेस जॉन्सनने एकाच षटकात अॅलिसा हिली आणि किरण नवगिरे यांना बाद करून यूपीला बॅकफूटवर आणले. १७ चेंडूत १४ धावा करून कर्णधार हीली बाद झाली. त्याचवेळी नवगिरेला दोन चेंडूंत केवळ दोन धावा करता आल्या. यानंतर श्वेता सेहरावतही सहा चेंडूत एक धावा काढून बाद झाली. यूपीने दोन धावांच्या अंतरात तीन विकेट गमावल्या आणि संघाची धावसंख्या तीन बाद ३१ अशी झाली. इथून युपीला सामना जिंकणे फार कठीण झाले. पहिल्या दोन षटकात २२ धावा करणाऱ्या संघाला पॉवरप्लेमध्ये तीन गडी गमावून केवळ ३३ धावा करता आल्या. यानंतर ताहिला मॅकग्रा आणि दीप्ती शर्मा यांनी भागीदारी करून विकेट्सची पडझड थांबवली, पण त्यांना धावगतीवर नियंत्रण ठेवता आले नाही. यूपीने १० षटकांचा खेळ होईपर्यंत तीन गड्यांच्या मोबदल्यात ७१ धावा केल्या होत्या. शेवटच्या १० षटकात यूपीला विजयासाठी १४१ धावांची गरज होती. अशा स्थितीत दिल्लीचा विजय जवळपास निश्चित होता. यानंतर दीप्ती शर्माही २० चेंडूत १२ धावा करून बाद झाली.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ताहिला मॅकग्राने एका बाजूने लढत सुरू ठेवली आणि यूपीची धावसंख्या १०० धावांच्या पुढे नेली. तिने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, तोपर्यंत देविका वैद्य २१ चेंडूत २३ धावा करून बाद झाली आणि १२० धावांत पाच गडी गमावल्यानंतर यूपीला सामना जिंकणे जवळपास अशक्य झाले होते. ताहिला मॅकग्राने ५० चेंडूत अकरा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ९० धावा केल्या, पण तिला दुसऱ्या बाजूने कोणतीच साथ मिळाली नाही आणि यूपी संघाने ४२ धावांनी सामना गमावला. दिल्लीकडून जेस जॉन्सनने सर्वाधिक तीन बळी घेतले. मारिजाने कॅप आणि शिखा पांडेला प्रत्येकी एक विकेट मिळाली. नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेत दिल्ली संघाने सुरुवातीला संथ फलंदाजी केली, परंतु नंतर शफाली वर्मा आणि कर्णधार लॅनिंग यांनी आपले गियर बदलले. दोघांनी पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेत मोठे फटके खेळले. त्यामुळे दिल्लीने पहिल्या सहा षटकांतच ६२ धावा जोडल्या होत्या. यानंतर शफाली वर्मा १४ चेंडूत १७ धावा करून बाद झाली, पण दुसऱ्या बाजूला लॅनिंग मैदानातच राहिली. तिने ३२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
दिल्लीने नऊ षटकांत ८७ धावा केल्या होत्या. यानंतर पावसामुळे सामना थांबला, पण लॅनिंगची आक्रमक फलंदाजी सुरूच होती. दरम्यान, १२ चेंडूत १६ धावा करून मारिजेन कॅपही बाद झाली. पुढच्याच षटकात ४२ चेंडूत ७० धावा करून कर्णधार लॅनिंगही पॅव्हेलियनमध्ये परतली आणि युपीचा संघ सामन्यात पुनरागमन करेल असे वाटत होते. मात्र, अॅलिस कॅप्सीने हे होऊ दिले नाही. त्याने १० चेंडूत २१ धावांची तुफानी खेळी करत दिल्लीला सामन्यात परत आणले.कॅप्सी बाद झाल्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्ज आणि जेस जॉन्सन यांनी शानदार भागीदारी केली. दोघींनी ३४ चेंडूत ६७ धावा जोडल्या आणि दिल्लीची धावसंख्या ४ बाद २११ पर्यंत नेली. जेमिमाने नाबाद २२ चेंडूत ३४ आणि जॉन्सनने २० चेंडूत ४२ धावा केल्या.यूपी वॉरियर्सकडून सबीनम इस्माईल, राजेश्वरी गायकवाड, ताहिला मॅकग्रा आणि सोफी एक्लेस्टन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. तथापि, सबनीम वगळता सर्व गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट १० पेक्षा जास्त होता.
जेस जॉन्सनला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तिने फलंदाजी करताना नाबाद ४२ धावा केल्या होत्या तर गोलंदाजी करताना ३/४३ गडी बाद केले.
उद्या गुजरात विरुद्ध आरसीबी सामना संध्याकाळी ७:३० वाजता मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ आपले दोन्ही सामने हरल्यानंतर तक्त्याच्या तळाला आहेत. त्यामुळे कोणता संघ जिंकेल हे बघणे औस्तुक्याचे ठरणार आहे.