WPL:युपी वॉरियर्सचा १० विकेटने मोठा विजय आरसीबीच्या नावे पराभवाचा चौकार

Spread the love

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : युपी वॉरियर्सने शुक्रवारी महिला प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा १० गडी राखून पराभव केला. युपीचा हा दुसरा विजय आहे. त्याच्यासाठी कर्णधार अॅलिसा हिलीने नाबाद ९६ धावांची खेळी केली. आरसीबीचा स्पर्धेतील हा सलग चौथा पराभव आहे. स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील संघाने आतापर्यंत चारही सामने गमावले आहेत. दुसरीकडे, यूपीने तीन सामन्यांतून दोन विजय मिळवले आहेत. सोफिया एक्लेस्टोनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर युपीने आरसीबीला १९.३ षटकांत १३८ धावांत गुंडाळले. सोफियाने १३ धावांत चार विकेट घेतल्या.

तिच्यासह दीप्ती शर्माने २६ धावांत तीन आणि राजेश्वरी गायकवाडने २६ धावांत एक गडी बाद केला. प्रत्युत्तरात यूपी वॉरियर्सने ४२ चेंडू बाकी असताना १३ षटकात विकेट न गमावता १३९ धावा करत सामना जिंकला.आरसीबीकडून एलिस पॅरीने सर्वाधिक धावा केल्या. तिने ३९ चेंडूत ५२ धावांची खेळी खेळली आणि ६ चौकार आणि १ षटकार लगावला. अॅलिस पॅरी व्यतिरिक्त फक्त सोफी डिव्हाईन (३६ धावा) युपीच्या गोलंदाजांचा काही काळ सामना करू शकली. आरसीबीची कर्णधार स्मृती मंधनाने संघाची निराशा केली आणि तिला केवळ चार धावा करता आल्या.

कर्णधार हिलीने वॉरियर्ससाठी नाबाद ९६ धावा ४७ चेंडूंत झळकावताना १८ चौकार आणि १ शानदार षटकार लगावला. त्याचवेळी देविका वैद्यने चांगला खेळ करत ३१ चेंडूत पाच चौकारांसह नाबाद ३६ धावा केल्या. दोन्ही सलामीवीरांनी नाबाद १३९ धावांची भागीदारी केली. हिलीला तिच्या दमदार खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. ही सलामी जोडी फोडण्यासाठी मंधनाने सात गोलंदाजांचा वापर केला मात्र तिला कोणतेही यश मिळवता आले नाही. हिलीची नाबाद ९६ धावांची खेळी ही या स्पर्धेतील कोणत्याही खेळाडूने केलेली सर्वोच्च खेळी आहे. ताहिला मॅकग्राने नाबाद ९० धावा केल्या होत्या.

हे देखील वाचा

टीम झुंजार